संदीप चव्हाण
‘फुटबॉल’चा जादूगर पेलेने त्याच्या फुटबॉल कारकिर्दीतील विश्वविक्र मी 1000 वा गोल कोणत्या स्टेडियमवर केला होता माहिती आहे का? रिओच्या याच माराकना स्टेडियमवर.. अनेक भल्याबु:या आठवणी या स्टेडियमने आपल्या हृदयात दडवल्यात. याच स्टेडियमवर आज फुटबॉल जगताचा इतिहास बदलणार आहे.. टीम कोणतीही जिंको इतिहास बदललाच जाणार. त्यामुळे तमाम भारतीयांनो आज ‘जागते रहो’ कारण या एतिहासिक घटनेचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता..
हे तेच स्टेडियम आहे. जेथे ब्राझीलच्या आशा-अपेक्षांचा आजपासून 64 वर्षापूर्वी चुराडा झाला होता. 195क् साली याच स्टेडियमवर यजमान ब्राझील विश्वचषकच्या विश्वविजेतेपदासाठी खेळत होता. त्यावेळी सुपर फोरचा फॉरमॅट होता. चार गटातील चार विजेते ब्राझील, स्पेन, स्वीडन आणि उरुग्वे यांच्यात रॉबिन राऊंड पद्धतीने विश्वविजेता ठरणार होता. ब्राझीलने स्पेनचा 7-1, स्वीडनचा 6-1 असा धुव्वा उडविला होता. त्यामुळे त्यांना उरुग्वेविरुद्ध मॅच ड्रॉ करणंही पुरेसं ठरणार होतं. आधीचे विजय बघता अवघ्या ब्राझीलनं विजयोत्सवाची जय्यत तयारी केली होती. आणि नेमका घात झाला.. ब्राझील तो विश्वचषक उरुग्वेकडून 2-1 असा हरला. त्यादिवसापासून ‘माराकना’ स्टेडियमच्या नावाचा अपभ्रंश करून ‘माराकनाजो’ हा नवा शब्द जन्माला आला. म्हणजे मराठी भाषेत ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा..’ तर या स्टेडियमवर ब्राझीलच्या टीमने येऊन तो कलंक पुसावा यासाठी सारे आस लावून बसले होते; पण ब्राझीलच्या टीमचे पायही या स्टेडियमला लागले नाहीत. कारण ड्रॉनुसार ब्राझील जर फायनलला पोहोचली असती, तरच या स्टेडियमवर मॅच खेळू शकणार होती.. हा जुना इतिहास काही बदलला नाही; पण दोन नवे इतिहास मात्र नक्की घडतील..
पहिला इतिहास.. ‘मेस्सी’ नावाचा तिसरा देव फुटबॉल जगताला मिळेल.. आजवर फुटबॉल म्हटले की, ब्राझीलचा पेले आणि अर्जेटिनाच्या मॅराडोनातच तुलना व्हायची. आजही कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझील आणि अर्जेटिना यांच्यात ‘पेले’ मोठा की, ‘मॅराडोना’ यावरून वाद सुरू असतात. या वादात आता अर्जेटिनाच्या ‘मेस्सी’ची भर पडणार आहे. कारण जे मॅराडोनाला जमले नाही, ते मेस्सी करून दाखवू शकतो. कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझीलच्या जमिनीवर विश्वचषक जिंकत अर्जेटिनाचा ङोंडा जर मेस्सीनं माराकना स्टेडियमवर फडकावला, तर पेले की मॅराडोना यापेक्षा मेस्सी की मॅराडोना हाच वाद जास्त रंगेल. कदाचित 2क्18 च्या रशियातील विश्वचषकमध्ये अर्जेटिनाचे फॅन्स पेलेला ठक्कर देण्यासाठी मॅराडोनाएवेजी मेस्सीचं नाव पुढे करतील. प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरी बघितली तर गोलच्या बाबतीत मेस्सीनं मॅराडोनाला केव्हाचं मागे टाकलंय. फुटबॉल करिअरमध्ये मेस्सीने एकूण 457 मॅचमध्ये 354 गोल केलेत, तर मॅराडोनाच्या नावावर 588 मॅचमध्ये 312 गोल आहेत. पेले या तिघांत 1115 मॅचमध्ये 1क्88 गोलसहित पहिल्या क्र मांकावर आहे. व्यावसायिक फुटबॉल जगतात, तर पेले आणि मॅराडोनापेक्षाही जास्त विजेतेपद मेस्सीनं त्याच्या क्लबला मिळवून दिलीत. मेस्सीकडे नाहीय ते फक्त विश्वविजेतेपद. अर्जेटिनाने 1986 साली जेव्हा शेवटचा विश्वचषक जिंकला होता, तेव्हा तर मेस्सीचा जन्मही झाला नव्हता.. गेल्या काही वर्षात तर त्याने फुटबॉलच्या वर्ल्ड रेकार्डचा एकामागोमाग एक धडाका लगावलाय. आणि म्हणूनचं आजच्या पिढीसाठी ‘मेस्सी’ हा फुटबॉलचा देव वाटतोय..
इतिहास क्रमांक दोन - जर मेस्सी फेल गेला आणि अर्जेटिनाऐवजी जर जर्मनी विश्वविजेते झाले, तरीही इतिहास नक्की घडणार आहे. कारण लॅटिन अमेरिकेत झालेल्या आजवरच्या सर्व विश्वचषकमध्ये एकाही युरोपीयन टीमला विश्वविजेतेपद मिळवता आलेले नाही.
थोडक्यात माराकना स्टेडियमवर इतिहास नक्की घडणार आहे आणि तो घडत असताना ब्राझीलवासीयांना फक्त तो पाहावा लागणार आहे. तब्बल एक लाखाहून अधिक अर्जेटिनाचे समर्थक संघाला पाठिंबा देण्यासाठी रिओत दाखल झालेत. निळ्या आणि पांढ:या पटय़ांचा टी शर्ट आणि पाठीवर मेस्सी लिहिलेले टी शर्ट घातल्यामुळे अवघ्या रिओ शहरात निळ्या रंगाची लाट आली आहे असं वाटतंय. लाट कसली ही तर त्सुनामीच आहे..पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. आणि हो, दारूची दुकाने 24 तास खुली आहेत.. जर्मनी जिंकले, तर ब्राङिालियन खुशित आणि अर्जेटिना गममध्ये दारू ढोसतील, आणि अर्जेटिना जिंकली तर मग ब्राङिालियन गममे दारू ढोसण्याचा सप्ताहच पाळतील.. थोडक्यात काय, होऊन जाऊ द्या खर्च.. असाच सध्या रिओत मूड आहे..