बर्गिंहॅम : इंग्लंडमध्ये सुरू असलेली २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. आज सोमवारच्या दिवशी या स्पर्धेचा शेवट होणार आहे. आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंना ५ सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा असणार आहेत.
दरम्यान, भारताचे बॅडमिंटन खेळाडू भारतासाठी शेवटच्या दिवशी ३ सुवर्ण जिंकू शकतात. महिला एकेरीत पी.व्ही सिंधू आणि पुरूष एकेरीत लक्ष्य सेन यांचा फायनलचा सामना होणार आहे. याशिवाय पुरूष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पदकासाठी अंतिम फेरीत उतरतील. संध्याकाळी हॉकीमध्ये पहिल्यांदाच पदक जिंकण्यासाठी भारतीय पुरूष हॉकी संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाने हॉकीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत ६ सुवर्ण पदक जिंकली आहेत.
बॅडमिंटन - महिला एकेरी सुवर्ण पदकाचा सामना - पी.व्ही सिंधू - दुपारी १.२० वाजल्यापासूनपुरूष एकेरी सुवर्ण पदकाचा सामना - लक्ष्य सेन - दुपारी २.१० वाजल्यापासूनपुरूष दुहेरी सुवर्ण पदकाचा सामना - सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी - दुपारी ३ वाजल्यापासून
टेबल टेनिस - पुरूष एकेरी कांस्य पदकाचा सामना - जी साथियान - दुपारी ३.३५ वाजल्यापासूनपुरूष एकेरी सुवर्ण पदकाचा सामना - अचंता शरत कमल - दुपारी ४.२५ वाजल्यापासून
हॉकी -भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - पुरूष हॉकी फायनल - संध्याकाळी ५ वाजल्यापासून
भारताच्या खात्यात १८ सुवर्ण
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या दहाव्या दिवशी (रविवारी) भारतीय खेळाडूंनी तब्बल १५ पदके जिंकून स्पर्धेत पदकांचे अर्धशतक ठोकले. दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवून एकूण १५ पदक पटकावली, ज्यामध्ये ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ५५ पदक जिंकली आहेत. सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर स्थित आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १७४ पदक जिंकून पहिले स्थान पटकावले आहे. तर यजमान इंग्लंड १६६ पदकांसह दुसऱ्या आणि कॅनाडा ९१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. न्यूझीलंडने एकूण ४८ पदके जिंकली आहेत मात्र त्यांनी भारतापेक्षा एक सुवर्ण जास्त जिंकल्याने ते यादीत भारतापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. भारताने आतापर्यंत १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदक अशी एकूण ५५ पदके जिंकली आहेत.