पुणे : गेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सवर विजय आवश्यक आहे; मात्र त्यासाठी टीम रोहित शर्र्माचे आव्हान धोनी ब्रिगेडला मोडावे लागेल. आयपीएल स्पर्धेतील राज्यातील हा शेवटचा सामना आहे. यात विजय मिळवून पुणे घरच्या मैदानावरील परभवाची मालिका खंडित करते, की मुंबई सलामीच्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढते, हे रविवारी ठरेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री ८ वाजता ही लढत होत आहे. धोनी ब्रिगेडने मुंबई इंडियन्स विरुद्धचा सलामीचा सामना; तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजय मिळविला होता; मात्र इतर पाच सामन्यांत पुणे संघाला पराभव स्वीकारावा लागला. शुक्रवारी गुजरातविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात पुण्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे पुणे संघ आठ संघांच्या गुणतालिकेत ४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे, तर दुसरीकडे मुंबईने आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकत आठ गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. मुंबई पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढण्याबरोबरच स्पर्धेतील स्थान भक्कम करण्यासाठी मैदानात उतरेल. मुंबईने कोलकाताला ६ गडी राखून, तर पंजाबला २५ धावांनी नमवित पुन्हा विजयपथावर आगमन केले आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला आहे. (वृत्तसंस्था)
आज पुणे-मुंबई लढत
By admin | Published: May 01, 2016 1:40 AM