पुणे : ६१ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा बुधवारपासून (दि. २०) मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रंगणार आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नामवंत मल्लांच्या माती व गादीवरील कुस्त्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहेत. सर्वाधिक उत्कंठा असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या विजेत्याचा फै सला रविवारी (दि. २४) रात्री होईल.स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे उपस्थित राहणार आहेत.राज्यातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मंगळवारी अनेक संघ पुण्यात दाखल झाले. दुपारी पंच उजळणी वर्ग घेण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय पंच आणि कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड यांनी सर्व तांत्रिक अधिकाºयांना मार्गदर्शन केले. खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी झाली. दरम्यान, मंगळवारी मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन करण्यात आले.महिला मल्लांची लढत-महिलांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा ‘महाराष्ट्र केसरी’मध्ये प्रथमच महिलांच्या प्रातिनिधीक कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २३) महाराष्ट्राची प्रतिभावान खेळाडू अंकिता गुंड आणि हरियाणाची ममता यांच्यात लढत रंगणार आहे.
महाराष्ट्र केसरीत तांत्रिक बदल-गतिमान आणि बदलेल्या नियमानुसार आजची कुस्ती अधिक आक्रमक झाली आणि यामुळेच भूगांवची ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा चुरशीची आणि उत्कंठावर्धक होणार यात शंकाच नाही.आंतरराष्ट्रीय नियमानुसार कुस्तीगीरीला मार्गदर्शन करण्यासाठी येणाºया मार्गदर्शकाकडे परिषदेचे ओळखपत्र आवश्यक असणार वाढत्या वजनगटाची संख्या लक्षात घेऊन दोन गादी आखाड्याबरोबर दोन माती आखाडे तयार आहेत. कुस्तीतील वादविवाद होऊ नयेत म्हणून तसेच पंचासह मार्गदर्शकांना नियमांची सखोल माहिती व्हावी म्हणून परिषदेच्या निमंत्रणांखाली राज्यभर पंचशिबिरे पार पडली. एवढेच नव्हे तर आजच भुगांव येथे स्पर्धा ठिकाणी पुन्हा पंच उजळणी वर्ग घेण्यात आला. दिल्लीवरुन आधुनिक सामुग्रीसह स्कोअरबोर्ड मागविण्यात आले. मार्गदर्शकाने केलेले अपिल पाहण्यासाठी भव्य एलईडीची सुविधा निर्माण केली आहे. एकुणच तांत्रिक दृष्ट्या कोणत्याच गोष्टींची उणीव नाही. वजन झाल्याबरोबरकुस्तीगीर स्वत:चाच भाग्यक्रमांक स्वत: काढत आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि निपक्षपातीपणे सर्व गोष्टी होत आहेत.उद्या सकाळच्या सत्रात गेले वर्षभर केलेल्या तपश्चर्येचे फळ आजमिळविण्यासाठी ५७, ७४ आणि ७९ किलो वजन गटाचे गादी व माती विभागाचे मल्ल शड्डू ठोकून तयार आहेत. एकंदरीत सर्व पुणे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींची पाऊले भूगावकडे धाव घेत आहेत.-दिनेश गुंड(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)