ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - पाचव्यांदा वर्ल्डकप पटकावणा-या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मायकल क्लार्कने आजचा विजय फिलीप ह्यूजला समर्पित केला आहे. या वर्ल्डकपमध्ये आम्ही १६ खेळाडू घेऊन खेळलो, आज फिलीप असता तर आज तोदेखील आमच्यासोबत जल्लोष करत असता अशी भावनिक प्रतिक्रिया मायकल क्लार्कने दिली आहे.
न्यूझीलंडला नमवत ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २१५ वर नाव कोरले. संघाला विश्वविजेतेपद पटकावून देत क्लार्कने एकदिवसीय सामन्यांना अलविदा केला आहे. या सामन्यानंतर क्लार्कने भावूक प्रतिक्रिया दिली. या सामन्यात क्लार्कने दंडावर एक बँड बांधला होता. या बँडविषयी विचारले असता क्लार्क म्हणाला, या बँडवर पी.एच असे लिहीले आहे. यापुढे मी ऑस्ट्रेलियासाठी मैदानात उतरीन त्यावेळी हा बँड लावूनच खेळीन. आज फिलीप ह्यूज असता तर त्यानेदेखील विजयोत्सव साजरा केला असता. आजचा विजय मी फिलीपला समर्पित करतो असे क्लार्कने सांगितले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्यूजचा गेल्या वर्षी क्रिकेट सामन्यादरम्यान मृत्यू झाला होता. सिडनीत सुरु असलेल्या स्पर्धेत फिलीपच्या डोक्याला चेंडू लागला होता. फिलीप ह्यूज हा क्लार्कचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जायचा. आपल्या या मित्राला क्लार्कने श्रद्धांजली वाहून माणूसकीचे दर्शन घडवले. विजयानंतर आम्ही सर्वजण पार्टी करणार आहोत. या पार्टीत एक ड्रिंक आम्ही फिलीपसाठीही ठेवली आहे असे त्याने नमूद केले.
क्लार्कने ७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. यातील ५० सामन्यांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला. क्लार्कने २५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७,९८१ धावा केल्या असून यात आठ शतक व ५८ अर्धशतकांचा समावेश आहे. क्लार्क आता फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार आहे.