नवी दिल्ली: भारतीय बॉक्सर सतीश कुमारला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे त्याचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मात्र दुखापत झाला असतानाही सतीशनं रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. जगातिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाखोदिर जालोलोवला सतीशनं चांगली लढत दिली. पदक जिंकण्यात अपयश आलं असलं तरीही सतीशच्या झुंजार वृत्तीनं सगळ्यांची मनं जिंकली.
ऑलिम्पिक सुपर हेवीवेट प्रकारात भारताकडून पहिल्यांदाच बॉक्सर उतरला होता. सतीश कुमारनं ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. याआधीच्या लढतीत त्यानं जमैकाच्या रिकॉर्डो ब्राऊनचं आव्हान परतवून लावलं. या सामन्यात सतीशला दुखापत झाली. त्याच्या हनुवटीला आणि उजव्या डोळ्याजवळ इजा झाली. त्यामुळे ७ टाके पडले.
सतीश उपांत्यफेरीत उतरणार की नाही हे निश्चित नव्हतं. अखेरच्या क्षणी वैद्यकीय पथकानं त्याला उपांत्यपूर्व फेरीत उतरण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला. यानंतर सतीश रिंगमध्ये उतरला. सतीशनं दाखवलेल्या या विजिगीषू वृत्तीचं सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. सात टाके पडले असतानाही सतीश देशाचं प्रतिनिधीत्व करत रिंगमध्ये उतरला. जागतिक चॅम्पियन असलेल्या बखोदिर जालोलोवनं सतीशला ५-० नं पराभूत केलं. तिसऱ्या फेरीत सतीशची जखम स्पष्टपणे दिसत होती. मात्र तरीही सतीशनं लढत राहिला. त्याच्या याच झुंजार बाण्याचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.