सान मारिनो नावाच्या चिमुकल्या देशाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दर ११,३१३ नागरिकांच्या मागे एक पदक मिळालं. पदकतालिकेत सर्वोच्च स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या एकूण पदकांना त्या देशाच्या लोकसंख्येने भागलं , तर उत्तर येतं : २९ लाख १५ हजार ७८९ नागरिकांच्या मागे एक पदक ! खरंतर सान मारिनोला मिळाली आहेत फक्त ३ ऑलिम्पिक पदकं आणि चीनलाही मागे लोटलेल्या अमेरिकेला ११३.
लोकसंख्येच्या प्रमाणात ऑलिम्पिक पदकांचा हिशेब घालायला गेलं तर जगभरातील देशांच्या यादीत अमेरिकेचा क्रमांक साठावा आणि चीनचा अठ्ठ्यातरावा ! जेमतेम ३४००० लोकसंख्येचा सान मारिनो; पण या देशातल्या खेळाडूंनी २ रौप्य आणि १ कांस्य अशी तीन पदकं जिंकली. त्याखालोखाल असलेल्या बर्म्युडा, ग्रेनेडा आणि बहामाज या देशांची नावंही आपल्याला नवीच.