Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा दिवस आहे आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया व भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. गोल्फपटू अदिती अशोकनं दिग्गज खेळाडूंना टक्कर देताना दिसली, परंतु थोडक्यात तिचे कांस्यपदक हुकले. तिनं चौथे स्थान पटकावले, परंतु ऑलिम्पिक इतिहासात गोल्फमध्ये भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोत्तम व ऐतिहासिक कामगिरी आहे. आता सर्वांचे लक्ष बजरंग व नीरज यांच्याकडे आहे. नीरजने आज पदक जिंकेल्या, ऑलिम्पिकमधील भारताची १०० वर्षांची पदकांची प्रतीक्षा संपणार आहे.
नीरज चोप्रा आज भालाफेकीच्या फायनलमध्ये उतरणार आहे. २३ वर्षांच्या नीरजनं क्वालिफिकेशन फेरीत ८६.५९ मीटर लांब भाला फेक करून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक ( १९००) स्पर्धेत २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते.
मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. चोप्रानं यावर्षी ८८.०७ मीटर लांब भाला फेक करून ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली होती. क्वालिफाईंग राऊंडमध्ये त्यानं सुवर्णपदकाचा दावेदार आणि २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेता जर्मनीचा योहानेस वेटरला मागे टाकले होते. पदकाचे काही दावेदार पात्रता फेरीतच बाहेर झाले.
१९२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाच सदस्यीय भारतीय संघात ट्रॅक अँड फिल्डमधील तीन खेळाडूंचा सहभाग होता. अन्य दोघं ही कुस्तीपटू होती आणि तेव्हा भारताला एकही पदक मिळालेले नव्हते.