Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. चेक प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. नीरजच्या आजच्या कामगिरीने दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे.
शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला!
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक ( १९००) स्पर्धेत २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदक जिंकावे अशी त्यांची शेवटची इच्छा होती अन् ती आज नीरजनं पूर्ण केली.
मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. फोटो फिनिशमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॅलकॉल्म स्पेन्सने कांस्यपदक जिंकले. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९ जून २०२१मध्ये मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.