Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिनं पदकाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर सायंकाळी नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी केली. भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. या पदकासह भारताने ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कागगिरीचीही नोंद केली. २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. चेक प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. कोरोना संकटाच्या काळात नीरज चोप्रानं पंतप्रधान सहाय्यता निधीत दोन लाख, तर हरयाणा सरकारला १ लाखांची मदत केली होती. नीरजने आज सुवर्णपदक जिंकून भारताला टोकियोत एकूण ७ वे पदक जिंकून दिले. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ ( दोन रौप्य व ४ कांस्य) पदकं जिंकली होती. टोकियोत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्यपदक जिंकून पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ कुस्तीपटू रवी कुमार दहिया ( रौप्य), बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, भारतीय पुरुष हॉकी संघ, बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोईन व कुस्तीपटू बजरंग पुनिया ( सर्वांनी कांस्य) यांनी पदकाची कमाई केली. भारतीय संघ ४७व्या क्रमांकावर आहे.
- ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची कामगिरी - २०२१ - ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य), २०१२ - ६ ( २ रौप्य व ४ कांस्य), २००८ - ३ ( १ सुवर्ण व २ कांस्य), १९५२ -२ ( १ सुवर्ण व १ कांस्य), २०१६ - २ ( १ रौप्य व १ कांस्य)
- ८ सुवर्णपदकं - पुरुष हॉकी संघ- 1928,1932,1936,1948,1952,1956,1964,1980
- १ अभिनव बिंद्रा - २००८च्या बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकार
- १ नीरज चोप्रा - २०२० टोकियो ऑलिम्पिक भालाफेक