Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. शुक्रवारी झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला ४-३ असा पराभव पत्करावा लागला. ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला. भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय महिलांची १९८०नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
१९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सहा संघांमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी भारतीय महिला २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळल्या, परंतु त्या १२व्या स्थानावर राहिल्या. टोकियोत मात्र सलग तीन सामने गमावल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला संघाला अर्जेंटिनाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनला खेळाडूंनी कडवी झुंज दिली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिज्ने यांनी राजीनामा दिला.