Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी भारताच्या पदरी निराशाच आली. महिलांच्या 10 मीटर पीस्तुल आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आलं. त्यानंतर टेबल टेनिसपटू साथियन गणसेकरन आणि जिम्नॅस्टपटू प्रणती नायक यांनाही पराभव पत्करावा लागला. मेरी कोमनं पहिल्याच सामन्यात धडाका उडवताना सहज विजयासह आगेकूच केली, दुसरीकडे टेबलटेनिसपटू मनिका बात्रा हिनं दमदार पुनरागमन करताना मिळवलेला विजय हा लक्षवेधी ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक सुरू आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानंही मग ट्विट केलंच, पण त्याच्या ट्विटमुळे लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केलीय...
टेबल टेनिस महिला गटातील दुसऱ्या फेरीचा सामना चुरशीचा झाला. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या मनिका बात्राकडून यंदा फार अपेक्षा आहेत, परंतु यूक्रेनच्या मार्गारिटा पेसोत्स्कानं पहिले दोन गेम सहज जिंकले. त्यामुळे मनिकाचे कमबॅक अशक्यच वाटत होते. मार्गारिटानं 11-4, 11-4 असा गेम जिंकून 2-0 अशी घेतलेली आघाडी मनिकाला मोठणे आव्हानात्मक होते, परंतु तिनं तिसऱ्या गेममध्ये 11-7 असा विजय मिळवत सामन्यातील चुरस वाढवली. चौथ्या गेममध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. 11 मिनिट चाललेल्या या गेममध्ये मनिकानं 12-10 अशा विजयासह सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
मनिकाचा हा कमबॅक पाहून युक्रेनची खेळाडू गोंधळली आणि चुकांमागे चुका करत गेली. पण, पाचवा गेम 11-8 असा घेत तिनंही आव्हान दिले. सहाव्या गेममध्ये मनिका 2-5 अशी पिछाडीवर होती आणि तिनं सलग 9 गुण घेत हा गेम 11-5 असा नावावर करून सामना 3-3 असा बरोबरीत आणल्या. सातव्या गेममध्ये मनिकानं 7 मिनिटांत युक्रेनच्या खेळाडूवर 11-7 असा विजय मिळवूत 4-3 अशी बाजी मारली.