टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधवनं पुरुष सांघिक फेरीत अतनू दास व तरुणदीप राय यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली. मिश्र गटात त्यानं दीपिका कुमारीसोबत कौतुकास्पद कामगिरी केली, परंतु पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ब्रेडी एलिसनकडून पराभव पत्करावा लागला. पण, त्याच्या चिवट खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्राचा हा सुपूत्र घरी परतला अन् त्यानं आईच्या हातच्या पोळी भाजीवर ताव मारला. प्रविणचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आणि प्रविणचा साधेपणानं सर्वांची मनं पुन्हा जिंकली आहेत.
आता प्रविण जागतिक तिरंदाजी स्पर्धेची तयारी करत आहे. त्यानंतर २०२४च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीनं तो सराव करणार आहे. त्यामुळे तो पुन्हा घरी कधी येईल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळेच बहिणींनी देखील आजच रक्षाबंधन करून घेतले. "देशासाठी पदक मिळविण्याच्या दृष्टीने उतरलो होतो, परंतु आमच्याकडून काहीश्या चुका झाल्या. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणे एवढेच लक्ष्य आहे, प्रसंगी जीवाचे रान करणार" असा विश्वास त्यानं व्यक्त केला.
ऑलिम्पिकमधून परतल्यावर भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेले आहेत आणि ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत.
प्रवीण जाधव याच्या घरावर जेसीबी फिरवण्याची धमकीप्रविण जाधवच्या कुटुंबीयांना गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे. त्याचं घर जेसीबी पाडण्याची धमकी शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. प्रवीणचे वडील रमेश या वादाला एवढे कंटाळले आहेत की, त्यांनी हा वाद असाच सुरू राहिला तर गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवीणचे आई-वडील, काका आणि चुलत भाऊ सातारा जिल्ह्यातील सरडे गावात राहतात. येथे त्यांचा दोन खोलींचं छोटंस घर आहे. प्रवीणचे वडील गावात मजूरी करतात. प्रवीण भारतीय सैन्यात काम करत असल्यानं घराची परिस्थिती सुधारली आहे. अशाच प्रवीणच्या वडिलांना घराचं काम करायचं आहे, परंतु शेजारी त्यांना बांधकाम करण्यास देत नाही. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही त्यांची जागा आहे. प्रवीणच्या कुटुंबीयांनी घर मोठं बांधल्यास रस्ता आणखी छोटा होईल, असा त्यांचा दावा आहे. पण प्रवीणच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे.