गुजरातचे अब्जाधीश असेलेले हिरे व्यापारी सावजी ढोलकिया (Savji Dholakia ) यांनी मोठी घोषणा केली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या भारतीय महिला हॉकी टीमच्या (Indian women hockey team) प्रत्येक खेळाडूला बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे. (Gujarat Diamond Merchant Savji Dholakia Promises Houses, Cars For Women's Hockey Team)
भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमध्ये हरली आहे, तरीही उद्या कास्य पदकासाठी मॅच होणार आहे. ढोलकिया यांची कंपनी ज्या खेळाडूंना घरे बांधायची आहेत, त्यांना 11 लाख रुपयांची मदत देणार आहेत. याचबरोबर जर भारतीय संघाने पदक जिंकले तर ज्यांच्याकडे आधीपासून राहण्यासाठी घर आहे त्यांना 5 लाख रुपये एवढ्या किंमतीची कार देणार आहेत. ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांना घरे, गाडीपासून बंपर दिवाळी बोनस देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
ढोलकिया यांनी मंगळवारी ट्विट करून यांची माहिती दिली. आपला एचके ग्रुप महिलांच्या हॉकी टीमच्या खेळाडूंचा सन्मान करणार आहे. यासाठी जे खेळाडू घर घेऊ इच्छित आहेत त्यांना 11 लाख रुपये देण्यात येतील. ढोलकियांच्या या घोषणेनंतर अन्य काही लोकांनी देखील या संघाला बक्षिसे देण्याची घोषणा केली आहे. ढोलकिया यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेतील माझ्या भावाचे मित्र डॉ. कमलेश दवे सर्व विजेत्यांना एक एक लाख रुपये देणार आहेत.
सेमीफायनलमध्ये काय झाले...भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अर्जेंटिनाने भारतीय संघाला 2-1 ने हरविले होते. आता कांस्य पदकासाठी भारतीय टीम ग्रेट ब्रिटनसोबत लढणार आहे.