Tokyo Olympic : Kuwait's 57-year-old Abdullah Alrashidi : टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी अमेरिकेच्या व्हिंसेंट हॅनकॉकनं 9 वर्षांनं नेमबाजीच्या स्कीट प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकले. त्याचे हे तिसरे ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. 32 वर्षीय हॅनकॉकनं 60पैकी 59 गुणांची कमाई करताना डेन्मार्कच्या जेस्पर हॅनसेनला ( 55) रौप्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत हॅनकॉकला 15व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर बीजिंग 2008 व लंडन 2012 ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली होती.
पण, या दोघांपेक्षा कांस्यपदक जिंकणाऱ्या अब्दुल्लाह अलराशीदी यांचीच चर्चा अधिक रंगली आहे. ( Kuwait’s Abdullah Alrashidi). कुवैतच्या या नेमबाजानं 46 गुणांची कमाई करताना कांस्यपदक नावावर केलं. वयाच्या 57व्या वर्षी अब्दुल्लाह यांनी हे पदक पटकावले आणि त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. रिओ 2016 ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक जिंकले होते, परंतु त्यावेळी ते स्वतंत्र ऑलिम्पियन खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी झाले होते. 2016 मध्ये कुवैतवर ऑलिम्पिक बंदी घातली गेली होती.
मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी!
अब्दुल्लाह हे सातव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेत आहेत. त्यांच्या नावावर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तीन सुवर्ण ( 1995, 1997 व 1998) आणि एक रौप्य ( 2011) अशी चार पदकं आहेत. 1989 पासून ते स्पर्धेत सहभाग घेत आहेत, त्यांच्या नावावर आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेची सहा सुवर्ण व तीन रौप्यपदकं आहेत. आशियाई स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले आहे.