Tokyo Olympic : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधव याचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला. मिश्र, पुरुष सांघिक प्रकार आणि पुरुष वैयक्तिक गटात प्रविणनं चांगली कामगिरी केली. त्याला वैयक्तिक प्रकाराच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिक २०१६ मधील कांस्यपदक विजेता अमेरिकेचा ब्रँडी एलिसन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. एलिसनसमोर प्रविणनं सपशेल शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली अन् त्याला ०-६ अशी हार मानावी लागली. दुसरीकडे महिला वैयक्तिक गटात भारताच्या दीपिका कुमारीनं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. प्रविणनं पहिल्या फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. प्रवीण जाधव याने राऊंड ऑफ ३२ मध्ये बझारपोव्ह गॅल्सनचा ६-० अशा फरकाने धुव्वा उडवला. तरुणदीप राय यानंही पहिल्या फेरीत यूक्रेनच्या हुनबीन ओलेक्सीवर ६-४ असा संघर्षमयी विजय मिळवला, परंतु दुसऱ्या फेरीत इस्रायलच्या शॅनी इटली यानं टाय ब्रेकरमध्ये ६-५ अशा विजयासह तरुणदीपचे आव्हान संपुष्टात आणले. महिला वैयक्तिक गटात दीपिकानं विजयी घोडदौड कायम राखली. पहिल्या फेरीत तिनं भुटानच्या कर्मावर ६-० आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या मुसिनो-फर्नांडेझ जेनीफरवर ६-४ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रविण जाधवची कामगिरी?टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रविण जाधवनं मिश्र गटात दीपिकासह चायनीस तैपेईच्या संघावर ५-३ असा विजय मिळवला, परंतु उपांत्यपूर्व फेरीत कोरियाकडून भारतीय जोडीला ६-२ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष सांघिक गटात अतनु दास, तरुणदीप यांच्यासह प्रविणनं पहिल्या फेरीत कझाकस्तान संघाचा ६-२ असा पराभव केला, परंतु दुसऱ्या फेरीत कोरियाकडून ६-० अशी हार मानावी लागली.