Tokyo Olympic, PV Sindhu : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाल्यानंतर ताय झूनं दुसऱ्या गेममध्ये तुफान खेळ केला. तैपेईची खेळाडू सिंधूला तिच्या तालावर नाचवताना दिसली अन् त्यामुळेच भारतीय खेळाडूंकडून चुंकामागून चुका होत गेल्या. उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद झाली आहे, परंतु तिला कांस्यपदक जिंकण्याची एक संधी आहे. ( PV Sindhu, hasn't lost a single game till semis but lost in the straight game in semi-final but still has a chance to win bronze medal.)
पी व्ही सिंधू आणि चायनीस तैपेईच्या ताय झू-यिंग यांच्यातली जय-पराजयाची आकडेवारी ही यिंगच्या बाजूनं १३-५ अशी आहे. त्यामुळे भारताच्या सिंधूवर सुरुवातीपासून दडपण होतेच. मात्र, उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर अजून शर्यत संपलेली नाही, असा दृढ निश्चय व्यक्त करणाऱ्या सिंधूनं कडवा खेळ केला. झू-यिंगनं गुणाचे खाते उघडल्यानंतर सिंधूनं नेट जवळून खेळ करताना ५-२ अशी आघाडी घेतली. पण, तैपेईच्या खेळाडूनं सिंधूच्या शरिरावर फटके मारले. सिंधूनं ११-८ अशी आघाडी कायम ठेवली. ब्रेकनंतर तैपेईच्या खेळाडूनं सलग तीन गुण घेताना ११-११ अशी बरोबरी मिळवली. यावेळी सिंधूचे काही जजमेंटही चुकले अन् परतीचा फटका सोडण्याचा तिला नुकसान झाले. दोन्ही खेळाडू नेट जवळचाच खेळ करत होत्या आणि त्यामुळे पहिल्या गेममध्ये कट्टर चुरस पाहायला मिळाली. दोघीही आलटूनपालटून गुण घेत असल्यानं निकालाचा अंदाज बांधणे अवघड जात होते. ताय झूनं मनगटाचा सुरेख उपयोग करताना अखेरच्या क्षणापर्यंत शटल कोणत्या दिशेनं खेळेल याचा अंदाज सिंधूला लागू दिला नाही. २१व्या मिनिटाला ताय झूनं २०-१८ अशी आघाडी घेत मॅच पॉईंट जिंकला अन् २१-१८ फरकानं पहिला गेमही नावावर केला. ( Tai Tzu Ying takes the 1st game 21-18 against Sindhu )
पहिल्या गेममध्ये पॅचेसमध्ये खेळणाऱ्या सिंधूनं दुसऱ्या गेममध्ये रणनीती बदलली अन् खाली येणारे जलद स्ट्रोक्स खेळून प्रतिस्पर्धीला अवाक् केले. त्यात तैपेईच्या खेळाडूकडूनही झालेल्या चुकांचा सिंधुला फायदा झाला. पण, ताय झूनं ८-५ अशी आघाडी घेत जबरदस्त कमबॅक केले. सिंधुला चुका करण्यास तैपेईच्या खेळाडूनं भागपाडताना एक-एक गुण आपल्या खात्यात जमा केले. १२ मिनिटांता ताय झूनं ११-७ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर ताय झूनं अधिक आक्रमक खेळ करताना आघाडी १७-९ अशी भक्कम केली. पुन्हा एकदा दडपणाखाली सिंधूकडून चुकांचा पाढा वाचला गेला. २०-१२ च्या आघाडीसह ताय झूनं मॅच पॉईंट कमावला अन् दुसरा गेम १९ मिनिटांत २१-१२ असा जिंकून सिंधूला पराभूत केले.
महिलांच्या पहिल्या उपांत्य फेरीत चिनी खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. चेन यू फेईनं २१-१६, १३-२१, २१-१२ अशा फरकानं चीनच्याच हे बिंग जिआओचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.