टोकियो : भारतीय बँडमिंटन पटू पीव्ही सिंधूनं टोकिया ऑल्मपिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. गुरुवारी खेळण्यात आलेल्या राऊंड १६ मध्ये पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१-१५, २१-१३ नं पराभव केला. बँडमिंटनमध्ये भारताची एकमेव आशा असलेल्या पीव्ही सिंधूने अवघ्या ४१ मिनिटांमध्ये हा सामना जिंकला आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना जपानच्या यामागुची आणि दक्षिण कोरियाचा किम गा उन यांच्यात होणाऱ्या विजयी खेळाडूसोबत होणार आहे.
बुधवारी मुलींनीच विजयी कामगिरी करताना भारताला एकाच दिवशी तीन विजय मिळवून दिले. बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधूने बाद फेरीत प्रवेश केला. बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर तिरंदाजीमध्येही दीपिका कुमारी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या तिघींचा अपवादवगळता भारताच्या खेळाडूंना अन्य स्पर्धांमध्ये निराशाच पत्करावी लागली होती. बॅडमिंटनमध्ये भारताच्या पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सिंधूने अपेक्षित आगेकूच करताना हाँगकाँगच्या एनवाई चियुंग हिचा सरळ दोन गेममध्ये सहज पराभव केला. या शानदार विजयासह सिंधूने दिमाखात उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी असलेल्या चियुंगचा सिंधूने २१-९, २१-१६ असा पाडाव केला होता. चियुंगविरुद्ध सिंधूचा हा सहा सामन्यांतील सहावा विजय आहे. पहिला गेम सहजपणे जिंकल्यानंतर सिंधूला दुसऱ्या गेममध्ये काहीसे झुंजावे लागले. मात्र, सिंधूने मोक्याच्यावेळी जोरदार स्मॅशसह नेटजवळ नियंत्रित फटके मारत चियुंगच्या आव्हानातली हवा काढली. आय गटात समावेश असलेल्या सिंधूने सलग दोन सामने जिंकत गटात अव्वल स्थान मिळवले. बाद फेरीतील पहिल्याच सामन्यात तिला डेन्मार्कच्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या मिया ब्लिचफेल्टविरुद्ध खेळायचं होतं. ब्लिचफेल्टविरुद्ध सिंधूच्या जय-परायजय रेकॉर्ड ४-१ असा आहे. यंदाच्या वर्षी थायलंड ओपन स्पर्धेत ब्लिचफेल्टने सिंधूला नमवले होते. हा ब्लिचफेल्टचा सिंधूविरुद्धचा एकमेव विजय ठरला आहे. त्यानंतर आज सिंधूनं ब्लिटफ्लेटवर पुन्हा विजय मिळवला आहे.
या सामन्याविषयी सिंधू म्हणाली होती की, ‘हा सामना नक्कीच सोपा होणार नाही. मला चांगल्या प्रकारे तयारी करून दमदार पुनरागमन करावे लागेल. काही स्पर्धांमध्ये मी तिच्याविरुद्ध खेळली असून, या लढतीत प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. ब्लिचफेल्ट आक्रमक खेळाडू असून, मलाही आक्रमक खेळ करावा लागेल असं तिनं सांगितले होते.