भारतीय पुरुष हॉकी टीमनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी कांस्य पदकाची कमाई केली. तब्बल ४१ वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीत पदक मिळालं. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोष पाहायला मिळाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे. एका बाजूला भारतात प्रत्येक पदकानंतर जल्लोष होत असताना दुसऱ्या बाजूला चीनमध्ये मात्र रौप्य, कांस्य मिळवणाऱ्या खेळाडूंवर टीका होत आहे.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चिनी खेळाडूंवर खूप मोठा दबाव आहे. याआधी चिनी खेळाडूंनी असा दबाव कधीही अनुभवलेला नाही. सुवर्ण पदक न जिंकल्यास चीनमध्ये खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांच्या देशभक्तीवरच शंका घेतली जात आहे. त्यामुळेच चिनी खेळाडू सुवर्ण पदकासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. रौप्य, कांस्य जिंकल्यावर चिनी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंदच दिसत नाही.
चीनच्या मिश्र डबल टेनिस टीमचा गेल्या आठवड्यात अंतिम फेरीत पराभव झाला. या सामन्यानंतर संघानं देशवासीयांची माफी मागितली. 'मी देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. त्यासाठी मी माफी मागतो,' अशा भावना संघातला खेळाडू लिऊ शिवेननं व्यक्त केल्या. या सामन्यात चिनी संघ जपानकडून पराभूत झाला. चिनी संघानं अनेकदा जपानवर वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. मात्र त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
सुवर्ण पदक जिंकण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंवर चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर टीकेचा भडिमार होत आहे. तुम्ही देशाची मान शरमेनं खाली घालत आहात, अशा शब्दांत अंतिम फेरीत पराभूत झालेल्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या पदक तालिकेत चीन सध्या अव्वल स्थानी आहे. चीननं ३४ सुवर्ण पदकं जिंकली आहेत. त्या खालोखाल अमेरिका (३० सुवर्ण) आणि जपान (२२ सुवर्ण) यांचा नंबर लागतो.