ठळक मुद्दे टोकियो ऑलिम्पिक हे कमलप्रीतचं डेब्यू ऑलिम्पिक आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत कमलप्रीतची धडक.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वात चांगली बातमी आता अॅथलेटिक्सकडून आली आहे. महिलांच्या डिस्कस थ्रो (Discus Throw) स्पर्धेत भारताच्या कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur) अंतिम फेरीसाठी क्वालिफाय केलं आहे. कमलप्रीतचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे आणि तिनं आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदकाची आशा पल्लवीत केली आहे.
कमलप्रीत कौरनं स्पर्धेत ६४ मीटर डिस्कस फेकत क्वालिफिकेशन फेरीत दुसरं स्थान मिळवलं. क्लालिफिकेशन फेरीत अमेरिकेच्या डिस्कस थ्रोअरनं पहिलं स्थान मिळवलं. अमेरिकेच्या थ्रोअरनं ६६ मीटर पेक्षा अधिक अंतरावर डिस्कस फेकलं. एकीकडे पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळत असलेल्या कमलप्रीतनं अंतिम फेरीसाठी क्वालिफाय केलं, तर दुसरीकडे आपली चौथी ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या सीमा पुनियाच्या हाती मात्र निराशा आली. सीमा पुनियानं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ६०.५७ मीटरपर्यंत डिस्कस फेकलं. तिला अंतिम फेरीत स्थान मिळालं नसलं तरी क्वालिफिकेशन फेरीमध्ये ती सहाव्या स्थानावर राहिली तर ओव्हरऑल स्थान तिचं १६ वं होतं. डिस्कस थ्रोच्या नियमांनुसार केवळ पहिल्या १२ डिस्कस थ्रोअर्सना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळते. यासाठी प्रत्येक थ्रोअरला तीन संधी दिल्या जातात. त्यापैकी ज्यात कामगिरी उत्तम असेल त्याद्वारे स्पर्धकाची निवड केली जाते.