Tokyo Olympics 2020 opening Ceremony : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्धाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटात पार पडला. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्रेक्षकांविना हा सोहळा पार पडला असला तरी त्याचा थाट काही कमी जाणवला नाही. कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविनाच पार पडणार आहे. त्यात काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे स्पर्धेवरही अनिश्चिततेची टांगती तलवार होती. सर्व संकटांवर मात करून आज अखेर ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. पण, पाकिस्तानच्या खेळाडूंनी संचलनात कोरोना नियम मोडल्याचे समोर आले आणि आता सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका होत आहे.
पाकिस्तानी संघाचे ध्वजधारक खेळाडू उद्धाटन सोहळ्यात मास्क न घातलेले दिसले. सर्व देशांचे ध्वजधारक व अन्य खेळाडू मास्क घालून संचलनात सहभागी झाले होते. पण, पाकिस्तानची बॅडमिंटनपटू महूर शहजाद हिचा मास्क हनुवटीवर होता आणि नेमबाज खलिल अख्तर यांचा मास्क फक्त तोंडावर होता. किर्गिझस्तान आणि तजाकिस्तान संघातील खेळाडूंच्याही चेहऱ्यावर मास्क दिसला नाही.