नवी दिल्ली : टोकिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना कोरोना लस देण्यापासून सर्व सुविधा प्राधान्याने पुरविल्या जातील,असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक तयारीचा आढावा घेताना गुरुवारी दिले. ऑलिम्पिकदरम्यान १३५ कोटी लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठिशी असतील, असे सांगून आपल्यासोबत मी जुैलमध्ये प्रत्यक्ष संवाद साधेन,असेही खेळाडूंना आश्वस्त केले. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिकचे आयोजन होईल.‘देशातील युवक भक्कम आणि वैशिष्टयपूर्ण क्रीडा संस्कृती विकसित करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणारा प्रत्येक खेळाडू हजारो युवकांना खेळाकडे आकर्षित होण्याची प्रेरणा देतो,’असे मोदी म्हणाले.बैठकीत पंतप्रधानांनी खेळाडूंच्या लसीबाबत माहिती घेतली. टोकिओला जाणारे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आदेश दिले. भारताच्या १०० खेळाडूंनी ११ प्रकारात पात्रता गाठली आहे. आणखी जवळपास २५ खेळाडू पात्रता गाठू शकतात. याशिवाय पॅरालिम्पिकसाठी २६ जण पात्र ठरले असून आणखी १६ जणांचा यात सहभाग असू शकेल,’ अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. दरम्यान, भारतीय खेळाडूंच्या अधिकृत किटचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री किरेन रिजिजू प्रामुख्याने उपस्थित होते.
तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील; पंतप्रधानांनी घेतला ऑलिम्पिक तयारीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 6:05 AM