टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे. या पदक विजेत्या खेळाडूंमध्ये जागतिक विजेती पी व्ही सिंधू ही 'गोल्ड'ची मानकरी असेल असा दावा त्यांनी केला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे ( 120 खेळाडू) पथक दाखल झाले आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
गोपिचंद म्हणाले,''आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांपेक्षा यंदा भारताची पदकसंख्या ही सर्वाधिक असेल, असा विश्वास मला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये आपण 6 पदकं जिंकली होती आणि तो विक्रम यंदा मोडला जाईल. यंदा पदकांची संख्या दुहेरी होईल, असेही मला वाटते. कारण, खेळाडूंना अऩेकांचा पाठींबा आणि सरकारकडून मदत मिळाली आहे. त्यामुळे खेळाडूंनी आणखी पदक पटकावल्यास, हा मदतीचा ओघ आणखी वाढेल.''
''नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग, यांच्याकडून अधिक अपेक्षा आहेत,'' Heartfulness Institute आणि Dhyana यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते अधिकृत मेडिटेशन पार्टनर आहेत. गोपिचंद यांनी सायना नेहवाल व सिंधू यांना मार्गदर्शन दिले. सायनानं ऑलिम्पिकमध्ये कांस्य, तर सिंधूनं रौप्यपदकाची कमाई केली. यंदाही सिंधूला सुवर्ण जिंकण्याची संधी आहे.
''रिओ आणि लंडन ऑलिम्पिकपेक्षा यंदा बॅडमिंटनमध्ये अधिक चांगली संधी आहे. सिंधू यंदा सुवर्णपदक जिंकेल, याची मला खात्री आहे. चिराग आणि सात्विक यांना आव्हानात्मक ड्रॉ मिळाला आहे, परंतु त्यांच्यातही पदक जिंकण्याची क्षमता आहे. साई प्रणिथसमोर खडतर आव्हान आहे, परंतु त्यानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवली आमि त्याची पुनरावृत्ती त्याच्याकडून होईल, अशी आशा आहे,''असे गोपिचंद म्हणाले,