जपानच्या टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेची तयारी जोरदार सुरू आहे. कोरोना काळात ऑलम्पिक स्पर्धेचं यशस्वी आयोजन करणं आयोजन समितीसाठी एक मोठं आव्हान आहे. ऑलम्पिकच्या परंपरेनुसार, खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना तिथे राहत असताना मोफत कंडोम दिले जातील. यावेळी या कंडोमची संख्या १ लाख ६० हजार इतकी असेल. पण यावेळी यात एक समस्या आहे.
आयोजकांनी खेळाडूंवर इथे राहत असताना कंडोमच्या वापरावर बंदी घातली आहे. आयोजन समितीने घोषणा केली आहे की, खेळाडू हे कंडोम आठवण म्हणून घरी घेऊन जाऊ शकतात. आपापल्या देशात गेल्यावरच त्यांनी या कंडोमचा वापर करायचा आहे.
आयोजन समितीने असा निर्णय घेतलाय की, कंडोम असल्याने खेळाडू कुणाच्या संपर्कात येऊ शकतात. मात्र, कोरोना महामारी काळात त्यांना याचा वापर करायचा नाहीये. समितीने सांगितले की, आमचा उद्देश आणि लक्ष्य हे आहे की, खेळाडूंनी इथे राहत असताना कंडोमचा वापर करू नये.
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने सुरक्षित लैंगिक संबंध आणि एचआयव्ही रोखण्याला प्रोत्साहन देण्यासाठी १९८८ मध्ये स्पर्धेत कंडोम देण्याची प्रथा सुरू केली. असं असलं तरी गेल्यावेळी पेक्षा यावेळी कमी कंडोम दिले जातील. रिओ ऑलम्पिक दरम्यान आयोजकांनी खेळाडूंना ४ लाख ५० हजार कंडोम वाटले होते.
२०२१ ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या साधारण ११ हजार खेळाडूंपैकी प्रत्येकासाठी जवळपास १४ कंडोम आहेत. जुने नियम आणि परंपरा कोविड-१९ च्या आधी होत्या. आता आयोजक एका वैश्विक आरोग्य अभियानाचा भाग म्हणून खेळाडूंना एकमेकांना स्पर्श न करण्याचा सल्ला देत आहेत.