टोकियो : टोकियो ऑलिम्पिक २०२० चे आयोजन कोरोनामुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आले आहे. कोरोना पुढच्यावर्षीही आटोक्यात न आल्यास पुन्हा स्थगिती देण्याची शक्यता मात्र आयोजकांनी फेटाळून लावली. कोरोनाचा प्रकोप कायम राहिल्यास आॅलिम्पिक रद्द करण्यात येईल, असे आयोजन समिती प्रमुखांनी मंगळवारी स्पष्ट केले.जगभरातील खेळाडू आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील इतपत कोरोनावर पुढील वर्षीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल का, अशी शंका वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केली असताना आयोजकांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोनामुळे स्थगित झालेल्या टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी २३ जुलै २०२१ ला होईल. हे आयोजन आणखी स्थगित करणे शक्य नसल्याचे आयोजन समिती अध्यक्ष योशिरो मोरी यांनी म्हटले आहे.‘निक्कन स्पोर्ट्स’या जपानच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोरी यांना कोरोनाचा प्रकोप पुढील वर्षीपर्यंत कायम राहिल्यास स्पर्धा पुन्हा स्थगित होऊ शकतील का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मोरी म्हणाले, ‘नाही, असे झाल्यास स्पर्धा कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील.’ टोकियो आॅलिम्पिक २०२० चे प्रवक्ते मासा तकाया यांनी मात्र आॅलिम्पिक रद्द करण्याच्या शक्यतेवर भाष्य करण्यास नकार दिला. मोरी यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे मासा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.या आधी जपानच्या आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोरोनावर लस विकसित झाली नाही तर पुन्हा आयोजन करणे कठीण असल्याचे वक्तव्य केले होते. आॅलिम्पिक होऊ नये असे आमचे मत नाही , मात्र लस येईपर्यंत आयोजन कठीण आहे, असा सूचक इशारा जपानमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनीदेखील दिला आहे.कोबे विद्यापीठाच्या संक्रमण विभागाचे तज्ज्ञ केंटारो इवाता यांनी आॅलिम्पिक पुढील वर्षी होईल, याविषयी शंका उपस्थित केली. जपानमध्ये पुढील वर्षी उन्हाळ्यापर्यंत कोरोनावर मात करता येईल, मात्र जगात प्रत्येक ठिकाणी असे होईल का, असा प्रश्न उपस्थित करीत मी पुढच्या वर्षी आॅलिम्पिक आयोजनाबाबत अधिक आशावादी नसल्याचे इवाता यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>बीजिंग हिवाळी आॅलिम्पिकवरही संकट१५ महिन्यानी आॅलिम्पिकला सुरुवात होईल का? जर झाली तर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी असेल का? कोरोनावरील लसचा शोध जरी लागला नाही तरीसुद्धा आॅलिम्पिक होईल का? यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. टीव्हीच्या प्रसारणकर्त्यांकडून आणि प्रायोजकांकडून ९१ टक्के उत्पन्न आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) आॅलिम्पिकमुळे देण्यात येते. सध्याच्या स्थितीत इतके उत्पन्न मिळेल का? हादेखील प्रश्न आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये बीजिंग येथे हिवाळी आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा ठरल्याप्रमाणे होईल का, हासुद्धा प्रश्न आहे. चीनमधूनच कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाली. आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी याआधीच आॅलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी झाली नाही तर दुसरा पर्याय समोर नसल्याचे स्पष्ट केले आहे.> याआधीही महायुद्धाच्या काळात आॅलिम्पिक रद्द झाले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई हीदेखील ‘अदृश्य शत्रूविरुद्धचे युद्ध’च आहे. व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्यास पुढील उन्हाळ्यात आॅलिम्पिकचे शानदार आयोजन होईल.- योशिरो मोरी, आयोजन समिती अध्यक्ष
...तर टोकियो ऑलिम्पिक रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:13 AM