टोकियो - तिरंदाजीमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भारताला आज मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला महिलांच्या तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले आहे. ( Big blow to India, Deepika Kumari loses in the quarter-finals of archery)
आज दीपिका कुमारी आणि कोरियाची सॅन अॅन यांच्यात झालेल्या लढतीमध्ये दीपिकाचा फॉर्म दिसलाच नाही. तिचा बऱ्याचदा तिचा निशाणा भरकटलेला दिसला. पहिल्या सेटमध्ये सॅन अॅनने तीनवेळा फरफेक्ट १० निशाणा साधत सेट जिंकला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेटही सॅन अॅनच्या नावे राहिला. त्यामुळे तिने दीपिकाचे आव्हान सहजपणे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली.
दरम्यान, आज सकाळी झालेल्या लढतीत दीपिका कुमारीने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक शुटआऊटमध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पाच सेटनंतर दोन्ही तिरंदाजांमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. त्यानंतर दीपिकाने या दबावाचा यशस्वीपणे सामना करत शूटऑफमध्ये परफेक्ट १० स्कोअर केला आणि रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदत विजेतीचे आव्हान परतवून लावले होते.
एका निशाण्यावर निर्णय होणाऱ्या शूटऑफमध्ये रशियन तिरंदाज पेरोव्हा ही दबावाखाली दिसली. तिला केवळ ७ गुण मिळवता आले. तर दीपिकाने परफेक्ट १० स्कोअर करत पेरोव्हा हिला ६-५ अशा फरकाने पराभूत केले. यी विजयासह ऑलिम्पिक तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भारताची पहिली तिरंदाज ठरली होती.