टोकियो - जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या प्रवीण जाधवने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रवीण जाधवने रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रवीण जाधव याने राऊंड ऑफ ३२ मध्ये बझारपोव्ह गॅल्सनचा ६-० अशा फरकाने धुव्वा उडवला. (Indian archer Pravin Jadhav beats Galsan Bazarzhapov of Russian Olympic Committee 6-0)
या लढतीत प्रवीण जाधव सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने अचूक निशाणा साधत पहिल्या सेटमध्ये १०,९,१० असा स्कोअर केला. त्याचा एकूण स्कोअर २९ राहिला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ९,९,१० असा मिळून २८ स्कोअर केला. तिसऱ्या सेटमध्येही प्रवीणने ९,९,१० असा मिळून २८ स्कोअर केला. तिन्ही सेट जिंकल्याने प्रवीण जाधवला एकूण सहा गुण मिळाले. त्याबरोबच त्याने बझारपोव्हचा ६-० ने पराभव केला.
सिंधूची विजयी घोडदौडदरम्यान, पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. सिंधूने महिला एकेरीमध्ये आज झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली. सिंधूने हा सामना २१-९, २१-१६ असा जिंकला. आज हाँगकाँगच्या नगन यी चेंग हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत सिंधूने पहिल्या लढतीप्रमाणेच आक्रमक खेळ करत एकतर्फी वर्चस्व राखले. सिंधूने पहिला गेम २१-९ असा आरामात जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये हाँगकाँगच्या खेळाडूने सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची झुंज मोडीत काढत हा गेमही सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकत पुढची फेरी गाठली.