भारताची धावपटू हिमा दास हिचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १०० मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली. त्यामुळे २१ वर्षीय धावपटूला १०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तिनं २०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भाग घेतला, परंतु त्यात ती पाचवी आली.
'' दुखापतीमुळे कारकीर्दितील पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मला सहभाग घेता येणार नाही. १०० व २०० मीटर शर्यतीत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याच्या मी जवळ होते, पण दुखापतीमुळे ही संधी हिरावली गेली,''असे हिमानं पोस्ट केले.
तिनं पुढे लिहिले की,''कोच, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानते. मी सर्वांना खात्री देते की दमदार कमबॅक करेन आणि राष्ट्रकुल स्पर्धा २०२२, आशियाई स्पर्धा २०२२ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा २०२२ गाजवण्यासाठी कसून मेहनत घेईन.''