Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला आणि कांस्यपदकावर कब्जा केला. भारतीय महिला हॉकी संघाची ऑलिम्पिक स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून महिला खेळाडूंशी संवाद साधला अन् त्यांचे कौतुक केले.
मोदींनी भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि त्यांच्या लढाऊ वृत्तीचं कौतुक केलं. मोदींचे हे कौतुकास्पद बोल ऐकून खेळाडू इमोशनल झाले अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले. मोदी म्हणाले की,पदक आणण्यात तुम्ही अपयशी ठरला असाल तरी तुम्ही मैदानावर गाळलेला घाम हा देशातील कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. संघातील प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकाचे मी अभिनंदन करतो.''