टोकियो : दुखापतींनी बेजार असतानाही लढत खेळावी लागल्याचा फटका बसल्याने भारताचा बॉक्सर सतीश कौशिक याला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. ९१ किलोहून अधिक वजनी गटातून खेळत असलेल्या सतीशला चांगल्या कामगिरीनंतरही विश्वविजेत्या बखोदिर जालोलोव याच्याविरुद्ध ०-५ असा पराभव पत्करावा लागला.
उप-उपांत्यपूर्व फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राउनविरुद्ध खेळताना सतीशला दोन कट लागले होते. यामुळे उपांत्यपूर्व फेरीत चेहऱ्यावर टाके लागले असतानाही तो खेळला. सहजासहजी हार न पत्करलेल्या सतीशने यावेळी उजव्या हाताने जोरदार ठोसे मारताना जालोलावला दबावात आणले.परंतु, जालोलावने लवकरतच स्वत:ला सावरुन घेताना सामन्यावर नियंत्रण मिळवले. तिसऱ्या फेरीदरम्यान सतीशच्या कपाळावरील जखमेतून रक्तही वाहू लागले, मात्र तरीही तो थांबला नाही. मात्र खेळण्यात अडचणी येत राहिल्यानंतर अखेर सतीशला पराभव पत्करावा लागला. या विजयासह जालोलावने कारकिर्दीतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. सामन्यानंतर त्याने सतीशच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक केले.
भारतीय बॉक्सिंगचे परफॉर्मन्स निर्देशक सँटियागो नीवा यांनी सांगितले की, ‘सध्या सतीन अत्यंत निराश आहे. पण जेव्हा तो सामान्य स्थितीत येईल, तेव्हा त्याला जाणवेल की, दुखापतीसह रिंगमध्ये उतरणं किती आव्हानात्मक आणि मोठी गोष्ट आहे. दुखापत असतानाही अशाप्रकारची लढत देणे कौतुकास्पद आहे. प्रत्येक ठोश्यानंतर त्याला वेदणा होत होत्या.’ ऑलिम्पिकमध्ये हेविवेट गटासाठी पात्र ठरणार सतीश पहिला भारतीय बॉक्सर ठरला होता.