टोकियो - भारताची युवा बॉक्सर लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच लवलीना हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत प्रवेशाने लवलीनाचे कांस्यपदक निश्चित झाले असले तरी आता उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतींमधून चांगली कामगिरी करत पदकाचा रंग बदलण्याची संधी तिच्याकडे असेल. तसेच ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी लवलिना ही दुसरी महिला आणि एकूण तिसरी बॉक्सर ठरली आहे. (Lovlina Borgohain beats Chinese Taipei's Chin-Chen Nien 4-1, assured of a medal)
ऑलिम्पिकमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. लवलिना हिने पहिल्या फेरीमध्ये तैवानच्या निएन चिन चेनचे आव्हान ३-२ अशा फरकाने परतवून लावले. त्यानंतर दुसऱ्या फेरीवरही लवलिना हिचाच वरचष्मा दिसून आला. तिने ही फेरी ५-० अशी सहज जिंकत सामन्यावर आणि पदकावर कब्जा केला.
याआधी २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरीकोम हिने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. मात्र यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मेरीकोम हिला पदकाने हुलकावणी दिली. मात्र आता उपांत्य फेरीत विजय मिळवून मेरीकोम हिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याची संधी लवलीना हिच्याकडे असेल.
तिरंदाजीत दीपिका कुमारीची उपांत्यपूर्व फेरीत धडकभारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने आज टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी हिने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक शुटआऊटमध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पाच सेटनंतर दोन्ही तिरंदाजांमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. त्यानंतर दीपिकाने या दबावाचा यशस्वीपणे सामना करत शूटऑफमध्ये परफेक्ट १० स्कोअर केला आणि रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदत विजेतीचे आव्हान परतवून लावले.