टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणाऱ्या मीराबाई चानू हिनं नुकतीच महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. वेटलिफ्टर मीराबाईनं सोशल मीडियावर सचिनसोबतचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. यावेळी सचिननं तिच्या मेडलची पाहणी करताना तिला शुभेच्छा दिल्या. २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu) ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारतानं या ऑलिम्पिकमध्ये १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली.
PR Shrijesh : ४१ वर्षांनी भारताला पदक जिंकून दिलं अन् सत्कारात मिळाले धोतर, शर्ट व १००० रुपये...
मीराबाईनं ट्विट केलं की,''सचिन तेंडुलकर सरांची भेट घेऊन आनंद झाला. त्यांचे प्रेरणादायी शब्द हे सदैव माझ्यासोबत राहतील. ( Loved meeting sachin Sir this morning! His words of wisdom & motivation shall always stay with me. Really inspired.)
मीराबाईनं स्नॅच प्रकारात पहिल्या दोन प्रयत्नांत ८४ व ८७ किलो वजन उचलले, परंतु तिसऱ्या प्रयत्नांत ८९ किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली अन् तिला दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. चीनच्या होऊ झिहूनं ९४ किलो वजन उचलून ऑलिम्पिक रिकॉर्ड नोंदवला. मीराबाईनं २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ८७ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले होते.
२०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर मीराबाई खचली होती, परंतु तिनं २०१७मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकले अन् त्यापाठोपाठ २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही बाजी मारली. कंबरेच्या दुखापतीमुळे तिला अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं प्रथमच २०० किलो वजन उचलले. तरीही तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. २०२१च्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्देत तिनं क्लिन अँड जर्कमध्ये ११९ किलो वजन उचलून नवा वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला.