भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. नीरज जेव्हा फायनलसाठी मैदानावर आला तेव्हा तो प्रचंड तणावात होता. त्याला त्याचा भाला सापडत नव्हता अन् त्यामुळे त्याचं टेंशन अधिकच वाढलं होतं. याबाबत नीरजनं TOI ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ( Olympic gold medalist Neeraj Chopra revealed that on the day he won the gold, he was taken a bit off guard after he could not locate his javelin)
भालाफेकीच्या फायनलमध्ये नीरजसह पाकिस्तानचा अर्षद नदीम हाही सहभागी होता अन् त्याच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. फायनलपूर्वी भालाफेकीला जाण्यापूर्वी नीरजचा भाला गायब होता. नीरज तो भाला इकडेतिकडे शोधताना दिसला अन् तो भाला पाकिस्तानच्या नदीमच्या हातात सापडला. नीरजचा भाला घेऊन नदीम मैदानावर फिरत होता. नीरजला हे कळताच त्यानं तो त्याच्याकडून घेतला.
नीरज काय म्हणाला, ऑलिम्पिक फायनलपूर्वी मी माझा भाला शोधत होतो, मला तो सापडत नव्हता. अचानक मला तो अर्षद नदीमच्या हाती दिसला. तो माझा भाला घेऊन मैदानावर फिरत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो,''भाई तो भाला मला दे तो माझाय.. मला तो फेकायचा आहे.'' त्यानं मला तो परत केला. त्यामुळेच मला पहिल्या प्रयत्नात चांगली कामगिरी करता आली नाही.
पाहा व्हिडीओ...
नदीमच्या या कृतीमुळे नीरज नाराजच दिसत होता. नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. अन् सुवर्णपदक पक्के केले. या कामगिरीमुळे नीरजनं जागतिक भालाफेक क्रमवारीत १४ स्थानांनी झेप घेताना थेट दुसरा क्रमांक पटकवला आहे. त्याच्या खात्यात आता १३९५ गुण जमा झाले असून जर्मनीचा जोहानेस वेट्टर हा १३९६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे वेट्टरला ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मार्सिन क्रुकोवस्की ( १३०२) तिसऱ्या, टोकियोत रौप्यपदक जिंकणारा जाकूब व्हॅड्लेजच ( १२९८०) चौथ्या आणि ज्युलियन वेबर ( १२९१) पाचव्या क्रमांकावर आहे.