२०१२नंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पुरूष गटात पहिले पदक जिंकून देत रवी कुमार दहियानं टोकियोत इतिहास रचला. २०१२मध्ये सुशील कुमारनं रौप्यपदक जिंकले होते आणि दहियानं टोकियोत ५७ किलोच्या वजनी गटात रौप्य जिंकून सुशीलशी बरोबरी केली. पण, रवी कुमार दहियानं अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात विजयानंतर ना जल्लोष केला, ना अंतिम सामन्यातील पराभवावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव तेव्हा होते तसेच फायनलमधील पराभवानंतरही कायम दिसले. जगातील दिग्गज कुस्तीपटूंना चीतपट करणारा हा खेळाडू दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर धडे गिरवत होता अन् तेथील सहकारी त्याला 'शांत' वादळ या नावानं हाक मारतात.
२३ वर्षीय कुस्तीपटू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत कुठेच नव्हता, परंतु त्यानं सर्वांना अचंबित करत ५७ किलो वजनी गटाचे रौप्यपदक जिंकून देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या युवा खेळाडूचा मान पटकावला. रुस ऑलिम्पिक समितिच्या विश्वविजेत्या जावूर युवूगेव्हनं ७-४ अशा फरकानं त्याला पराभूत केले. रौप्यपदक जिंकल्यानंतर रवी कुमार दहिया म्हणाला,'' मी टोकियोत रौप्यपदक जिंकण्यासाठी नव्हे तर सुवर्णपदकासाठी आलो होतो. या कामगिरीने मला समाधान मिळालेलं नाही. प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा चांगला खेळला म्हणून मला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असेल कदाचित. त्यानं चतुराईनं मला हरवलं.''
रवी १२ वर्षांचा होता तेव्हा सोनीपतमधील नाहरी गावातून तो दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल झाला. रवीचे सध्याचे प्रशिक्षक प्रवीण दहिया यांनी सांगितले की,''त्याला स्टेडियममध्ये एक लहानशी खोली मिळाली होती आणि त्याच्यासोबत दोन कुस्तीपटूही त्याच खोलीत रहायचे. कुस्तीपटूंच्या एकूण संख्येनुसार खोल्या दिल्या जायच्या. पण, आता त्याला मोठी खोली मिळेल, कारण त्यानं ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. तो नेहमीच शांत राहायचा. मातीत कुस्ती खेळायला उतरायचा तेव्हाही तो शांतच असायचा. आम्ही त्याला म्हणायचो, थोडसं हसत जा.''
रवी जेव्हा छत्रसाल येथे आला तेव्हा तो गुरू सतपाल आणि माजी प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनात सराव करायचा. टोकियो ऑलिम्पिकच्या काही महिन्यांपूर्वी वीरेंद्र यांची ट्रान्सफर झाली, पण रवी छत्रसाल येथेच राहिला. तेथे त्यानं सतपाल व सुशील कुमार व प्रविण दहिया यांच्यासोबत सराव केला.
क्लास १ जॉब, ५० टक्के सवलतीत जागा, कुस्तीसाठी स्टेडियम अन् ४ कोटीया ऐतिहासिक कामगिरीनंतर रवी कुमारवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. हरयाणा सरकारनं त्याला क्लाक वन नोकरी आणि हरयाणा येथे ५० टक्के सवलतीत जमिनीसह त्याच्या नाहरी गावी कुस्तीसाठी इन्डोअर स्टेडियम बांधण्यास परवानगी दिली आहे. शिवाय रौप्यपदक जिंकल्यामुळे ४ कोटींच्या बक्षीसाचीही घोषणा केली.