शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Tokyo Olympics: टॉम डेलीचं ऑलिम्पिक गोल्ड, बटवा आणि विणकाम!

By meghana.dhoke | Updated: August 3, 2021 05:53 IST

Tokyo Olympics Live Updates: स्टेडियममध्ये फावल्या वेळात शांतपणे विणकाम करणाऱ्या टॉमला ‘काय बायकांसारखे स्वेटर विणतोस’, असं कुणी म्हटलं नसेलच असं नव्हे!

- मेघना ढोके(मुख्य उपसंपादक, लोकमत)  

तर ही गोष्ट, सोशल मीडियात ट्रेंडिंग असलेल्या एका छायाचित्राची. त्याचा नायक आहे टॉम डेली. हा ब्रिटिश ‘डायव्हर’, जलतरणपटू. ऑलिम्पिकमधे सुरू असलेला स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगचा अंतिम सामना पाहायला म्हणून तो जाऊन बसला आणि मॅच पाहता पाहता त्यानं विणकामाच्या सुया काढल्या, हात झरझर चालू लागले, बोटं फिरू लागली आणि मस्त निवांत विणकाम सुरू झालं. हे काहीतरी अघटितच होतं, त्यामुळे ते छायाचित्र व्हायरल झालं. डेलीनं दोनच दिवसांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये १० मीटर्स मेन सिंक्रोनाइज्ड गटात मॅट ली नावाच्या सहकाऱ्यासोबत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यापूर्वीही रिओ आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं कांस्यपदक जिंकलेलं आहेच. हा मोठा कर्तबगार ‘सेलिब्रिटी’ खेळाडू. आपल्याला क्रोशा आणि विणकामाचा छंद आहे हे त्यानं जगापासून लपवलेलं नाही, उलट सुवर्णपदक जिंकल्यावर स्वत: त्या पदकासाठी विणलेला छोटा बटवाही त्यानं समाजमाध्यमातून आपल्या चाहत्यांना दाखवला. त्याच्यासाठी त्याची गोष्ट इथं संपली;पण जगभरात अनेकांसाठी ही गोष्ट याच बिंदूवरून पुढे सुरू झाली.समाजमाध्यमात अनेकांनी त्याचं कौतुक केलं. कुणी लिहिलं की, आय हॅव अ न्यू आयडॉल, तर कुणी म्हणाला हा खरा इंग्लंडचा नायाब हिरा आहे. कुणी लिहिलं की, असे छंद जपणं महत्त्वाचं, ज्यातून हात-डोळे-मेंदू यांची एकतानता साधत ‘मोटर स्किल्स’चा वापर वाढतो आणि  मानसिक स्वास्थ्य सुधारतं. ताणाचा निचरा होतो. ‘स्ट्रेस बस्टर’ म्हणून विणकाम, शिवणकाम, स्वयंपाक, कलाकुसर, भरतकाम, मातीची भांडी बनवणं या छंदांकडे कसं नव्यानं पहायला हवं, अशीही चर्चा मग रंगत गेली.  हे सारे मुद्दे खरे आहेतच. मात्र, त्याहूनही एक वेगळी गोष्ट हे छायाचित्र सांगतं.‘काय बायकांसारखे स्वेटर विणत बसतोस ऑलिम्पिक स्टेडियममध्ये?  ही काय पुरुषांची कामं आहेत का?’ असं कुणी त्याला जाहीर म्हटलं नसलं तरी टॉमने विणकामाच्या सुया चालवल्या हेच त्या छायाचित्रातलं खरं ‘बातमीमूल्य’ होतं. कामांना लिंगप्रधानता चिकटवलेला समाज जगभरातच आहे. त्यामुळे पुरुषांनी कर्तबगारी गाजवावी, हाती तलवारी धराव्यात, पुरुषी हातात विणकामाच्या सुया बऱ्या दिसतात का, असं टॉमला पाहून अनेकांच्या मनात आलंच नसेल, असं नाही. एवढंच कशाला, मीराबाई, लवलीना, सिंधू यांनी ऑलिम्पिक पदकं आणल्यावर समाजमाध्यमात अनेकांनी जाहीर टिप्पण्या केल्याच की, बांगड्या घालणारे हात पदक आणतात आणि पोलादी म्हणवणारी पुरुषी मनगटं मात्र रिकाम्या हातांनी परत येतात!! - या टिप्पणीत मोठा लिंगभेद आहे, बांगड्या घातलेले हात नाजूकसाजूक, त्यांच्या मनगटात बळ नसतं असंही हे विधान म्हणतं आणि पुरुषांवर पोलादी मनगटं घेऊन कर्तबगारी गाजवण्याची सक्तीही करतं. खेळाडू म्हणून हार-जीत होऊच शकते, त्यात ‘जेंडर रोल्स’ आणू नयेत, हेही न समजणारी आपली समाज मानसिकता. टॉमच्या जागी कुणी आपल्याकडचा खेळाडू आहे, अशी कल्पना करून पाहा!! काय बायकी कामं करतो म्हणून नाकं मुरडणारे कमी असतील का? घरकाम, स्वयंपाक, विविध नाजूक कला ही सारी बायकांची कामं, पुरुषांनी ती कशाला करायला हवी? पुरुषांनी कर्तबगारी गाजवायची ती घराबाहेर, कर्तृत्वाची सारी परिमाणंच ‘पुरुषी’. ती पैशात मोजली जातात, सत्तेत मोजली जातात, नाहीतर मैदानातल्या कर्तबगारीत!- टॉम डेलीच्या या छायाचित्राची म्हणूनच ‘बातमी’ होते.टॉमची स्वत:चा  प्रवास मात्र लिंगभेद टाळून  माणूसपणाच्या वाटेवरचा आहे. सुवर्णपदक जिंकल्यावर त्यानं जाहीरपणे सांगितलं, की मी गे आहे आणि गे असूनही मी ऑलिम्पिक चॅम्पिअन होऊ शकतो. पदक स्वीकारल्यानंतर तो भावना अनावर होऊन रडला, त्या रडण्याची दृश्य साऱ्या जगानं लाइव्ह पाहिली.  पदक जिंकल्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत टॉम म्हणाला होता, ‘एकेकाळी मला वाटायचं की, माझं आयुष्यात काहीच होणार नाही, मला काहीही जमणार नाही, मी स्वत:चीच ओळख शोधण्यासाठी धडपडत होतो, आज मी सांगू शकतो की, वेगळी ओळख घेऊन जगलात तरी तुम्ही जिंकू शकता.’ एलजीबीटीक्यू समूहाच्या प्रश्नांसंदर्भात तो जाहीरपणे बोलतो. लिंगभेद बाजूला ठेवून ‘माणूसपणाची’ वाट चालावी हा त्याचा विचार आहे. त्याची विचार प्रक्रिया पुरेशी स्पष्ट आणि थेट असल्याने तो आपला छंद म्हणून हातात सुया घेऊन विणायला बसतो. अवतीभोवती जगभरातील कॅमेऱ्यांचा लखलखाट आहे, लोक आपल्याला लाइव्ह पाहत आहेत. कोण काय म्हणेल  याची पर्वा न करता तो शांतपणे विणत बसलेला दिसतो..पुरुषांनी हातात तलवारी घेऊन लढावं,  असं म्हणणाऱ्या  जगात हातात विणकामाच्या सुया घेऊन बसलेला सुवर्णपदक विजेता ‘कर्तबगार’ पुरुष आश्चर्याचा धक्का देतो, यात काही नवल नाही. यानिमित्ताने ‘पदकं जिंकून आणणारे बांगड्यांचे हात’ आणि ‘विणकाम करणारे पुरुषी हात’ यातलं बातमीमूल्य वजा होण्याच्या प्रक्रियेला  आणखी थोडा वेग मिळाला,   तर ती यंदाच्या ऑलिम्पिकची  मोठीच कमाई ठरावी.meghana.dhoke@lokmat.com

 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021