टोकियो - जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या अभियानाची दमदार सुरुवात झाली आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. ( Wow! Mirabai, earn silver medal for India. India's medal account opened in Tokyo)
भारोत्तोलनाच्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले.
ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनामध्ये भारताला मिळालेले हे दुसरे पदक आहे. याआधी २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक पटकावणारी मीराबाई चानू ही भारताची दुसरी भारोत्तोलक ठरली आहे. त्याबरोबरच ऑलिम्पिकमध्ये पद मिळवणारी मीराबाई चानू ही कर्नाम मल्लेश्वरी, सायना नेहवाल, मेरीकोम, साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधू यांच्यानंतरची सहावी महिला खेळाडू ठरली आहे.