नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली होती. (India at Tokyo Olympics) ऑलिम्पिकमध्ये पदकांवर नाव कोरून आलेल्या खेळाडूंचे अभिनंदन आणि सत्कार सोहळे सुरू आहेत. (Vinesh Phogat) दुसरीकडे सुवर्णपदकाची अपेक्षा असूनही प्रत्यक्षात निराशा हाती लागलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटवर बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत भारतीय कुस्ती महासंघाने तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे विनेशला धक्का बसला असून, तिने एका मुलाखतीमधून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. (Wrestler Vinesh Fogat's feelings were shattered after the suspension)
विनेश फोगाट ही ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी प्रशिक्षक वोलेर एकोस यांच्यासोबत हंगेरीमध्ये सराव करत होती. तिथून ती थेट टोकियो येथे पोहोचली होती. तिथे तिने क्रीडा ग्रामात राहण्यास तसेच भारतीय संघातील खेळाडूंसोबत सराव करण्यास नकार दिला होता. तसेच तिने भारतीय पथकाचे अधिकृत प्रायोजक असलेल्या शिव नरेशची जर्सी परिधान करण्यास नकार देत सामन्यात नायकेचा पोशाख परिधान केला होता. त्यामुळे तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच तिला अस्थाई स्वरूपात निलंबित करण्यात आले आहे. तसेच कुस्तीसंबंधीच्या कुठल्याही घडामोडींमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, विनेशने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला असे वाटते की, मी एका स्वप्नामध्ये झोपले आहे. तसेच काहीही सुरू झालेले नाही. मी पूर्णपणे ब्लँक झाले आहे. माझ्या जीवनात काय चाललेय हे मला कळत नाही आहे. गेल्या आठवडाभरापासून माझ्या मनात खूप काही चालू आहे. ही दोन हृदये आणि दोन मेंदूंची गोष्ट आहे. मी आतापर्यंत कुस्तीला खूप काही दिले आहे. मात्र आता निरोप देण्याची वेळ आली आहे. मात्र दुसरीकडे जर मी कुस्ती सोडली, लढले नाही तर ते माझ्यासाठी खूप नुकसानकारक ठरेल. सध्या मी माझ्या कुटुंबावर लक्ष ठेवू इच्छिते. मात्र सध्या बाहेरच्या जगात सर्वजण मी मृत झाल्यासारखे माझ्याशी वागत आहेत. मला माहिती आहे. भारतामध्ये तुम्ही जेवढ्या वेगाने वर जाता तेवढ्याच वेगाने खाली येता. मी एक पदक गमावले आणि माझ्यासाठी सर्व काही समाप्त झाले, असे ती म्हणाली.
मी आथा पुन्हा मॅटवर कधी येईन हे मला माहिती नाही. कदाचित मी कधीच परत येणार नाही. मला वाटते मी त्या तुटलेल्या पायासोबतच बरी होती. मला काही बरे करायचे होते. मात्र आता माझे शरीर तुटलेले नाही. मात्री मी आता खरोखरच मी तुटले आहे.