टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) यंदा भारताचं मोठं पथक रवाना होणार आहे. यात तायक्वांदो खेळाडू अरुण तंवरचाही (Aruna Tanwar) समावेश असणार आहे. वाइल्ड कार्डच्या माध्यमातून टोकियोमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Paralympics) सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आजवर टोकियो ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमध्ये कोणताही भारतीय तायक्वांदो खेळाडू क्वालिफाय होऊ शकलेला नाही. पण यंदा भारताला वाइल्ड कार्डच्या माध्यमातून पॅरालिम्पिक तायक्वांदोमध्ये प्रवेश मिळाला आहे. पॅरालिम्पिक तायक्वांदोमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारी अरुणा भारताची पहिली खेळाडू ठरणार आहे.
अरुणाला जबरदस्त कामगिरीच्या जोरावरच वाइल्ड कार्डमधून पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे, असं भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगांवकर यांनी सांगितलं. "पॅरालिम्पिकमध्ये तायक्वांदोसाठी क्वालिफाय होणारी अरुणा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिनं तायक्वांदोसाठी भारताचे दरवाजे उघडले आहेत", असं शिरगांवकर म्हणाले.
हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील रहिवासी असलेली अरुणा जन्मापासूनच स्पेशल चाइल्ड आहे. तिचा हात आणि हाताची बोटं आखूड आहेत. पण अरुणानं कधीच त्याची कमतरता किंवा कमीपणा भासू दिला नाही. ती स्वत:ला नेहमी पराक्रमी आणि ताकदवान समजत आली आहे. अरुणाचे वडील एका खासगी बसचे ड्रायव्हर आहेत आणि आपल्या मुलीनं खेळात देशाचं नावं जगाच्या पाठीवर गाजवावं, असं त्यांचं स्वप्न आहे.
पाच वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या अरुणानं गेल्या चार वर्षांपासून आशियाई पॅरालिम्पिक चॅम्पियनशीप आणि जागतिक पॅरा तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत अरुणाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.