शिवाजी गोरे,(थेट रियो येथून)
भारतासारखाच विकसनशील देश असणारा ब्राझील. आपल्यासारख्या अनेक प्रश्नांनी त्रासलेला आहे. मात्र, एका गोष्टीत ब्राझीलने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. अगदी वाहतूक क्रांतीच झाली आहे. हे घडले आहे ते बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) सेवेमुळे. ब्राझीलमधील आॅलिम्पिकसाठी आलेल्यांचा प्रवास बीआरटी सेवेमुळे सुकर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बीआरटी सेवेबाबत ओरड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये १९७४ पासून बीआरटी सेवेला सुरुवात झाली. क्युरिताबा हे शहर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे केंद्र होते. फुटबॉलचा येथील उत्साह सर्वांना माहीतच आहे. त्यासाठी खास बीआरटी आणण्यात आली. यशस्वीही झाली. सध्या ब्राझीलमधील ३३ शहरात बीआरटी सध्या सुरू आहे. त्यातून रोज ३१.७ मिलियन नागरिक प्रवास करीत आहेत. जगात १८६ शहरांमध्ये बीआरटीचा प्रवास सुरू असून त्यातील ६० शहरे ब्राझीलमध्ये जगात असलेल्या ६ महाद्विपांमध्ये सुमारे १९.७ मिलियन नागरिक रोज प्रवास करीत आहेत. ब्राझीलच्या ग्रामीण भागात सुद्धा बीआरटी पोहोचली आहे. या गावांमधून शहरात येण्या-जाण्यासाठी येथील नागरीक बीआरटीमधूनच प्रवास करतात. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या बीआरटीने आम्ही प्रवास केला. नागरिकांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी सांगितले की, बीआरटी एक वरदान आहे. ब्राझीलचे प्रत्येक शहर ग्रामीण भागातील गावांनी या बीआरटीमुळे जोडले गेले आहे. देशांतर्गत तुम्ही जलद प्रवास करू शकता. बीआरटी लेनमध्ये इतर कोणतेही वाहन येऊ शकत नाही. हा मार्ग पूर्ण वेगळा आणि मुख्य म्हणजे मोकळा असतो. खासगी बस सेवा करणाऱ्या बसेस, ब्राझील शासनाच्या व प्रत्येक नगरपालिकेच्या बसेस अथवा रुग्णवाहिकाही या मार्गातून जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे बीआरटीचा दरही परवडणारा आहे. कमीत कमी ३.२५ रियाल (म्हणजे भारती चलनाप्रमाणे ९० रूपये २५ पैसे) असा दर आहे. ब्राझीलच्या बीआरटीची आणि पुण्यातील बीआरटीची तुलना केली तर पूण्यातील बीआरटी रस्त्यांवरून एसटी, पीएमटी खासगी गाड्या, मोटारसायकली, काही वेळेस सायकलीसुद्धा जात असतात. त्यातच जर एखाद्या मंत्र्याचा दौरा असेल तर त्यांच्या गाड्यांचा ताफाही बीआरटीतून जातो. ब्राझीलमध्ये अगदी पंतप्रधानांची गाडीही बीआरटीमधून जाऊ शकत नाही. बीआरटीच्या गाड्याही अत्यंत स्वच्छ आणि चकचकीत असतात. त्यामुळे प्रवास हा एक सुखकर अनुभव होत आहे.