ब्रिस्बेन : सलामीला चांगली भागीदारी झाल्यानंतर १६ धावांच्या अंतरात चार विकेट गमावल्यामुळे भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या चारदिवसीय सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर अडचणीत सापडला आहे. भारत ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात ४ बाद १५८ अशी अवस्था झाली असून डावाने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी अद्याप १०८ धावांची गरज आहे. भारत ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील १६९ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने ४३५ धावांची मजल मारली. दुसऱ्या डावात भारत ‘अ’ संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अखिल हेरवाडकर व फैज फझल यांनी सलामीला ३० षटकांत ८४ धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकीपटू जॉन हॉलंडने त्यानंतर तीन बळी घेतले, तर एक फलंदाज धावबाद झाला. त्यामुळे दिवसअखेर भारत ‘अ’ संघाची ४ बाद १५८ अशी अवस्था झाली होती. दिवसअखेर हेरवाडकर (८२) आणि संजू सॅम्सन (३४) खेळपट्टीवर होते. फझल (२९) धावबाद झाल्यानंतर भारताची घसरगुंडी उडाली. एकवेळ बिनबाद ८४ अशा मजबूत स्थितीत असलेला भारताचा डाव ४ बाद १०० असा गडगडला. हॉलंडने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने करुण नायरला पायचित केल्यानंतर मनीष पांडेला ब्यू व्हेबस्टरकडे झेल देण्यास भाग पाडले. नमन ओझा जॅक्सन बर्डकडे झेल देत माघारी परतला. हेरवाडकर व सॅम्सन यांनी पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची अभेद्य भागीदारी करीत डाव सावरला. हेरवाडकर दोनदा सुदैवी ठरला. हेरवाडकरने १८८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व ३ षटकार ठोकले. सॅम्सनने ७६ चेंडूंमध्ये ३ चौकार लगावले. त्याआधी, कालच्या ५ बाद ३१९ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव ४३५ धावांत आटोपला. पहिल्या डावात आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने २६६ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. आज ९९ धावांवरून पुढे खेळताना हिल्टन कार्टराईटने शतक पूर्ण केले. तो ११७ धावा काढून बाद झाला. त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. ठाकूरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा पाच बळी घेण्याची कामगिरी केली. भारताबाहेर त्याने प्रथमच पाच बळी घेतले. (वृत्तसंस्था)
भारत ‘अ’ संघ अडचणीत
By admin | Published: September 18, 2016 5:43 AM