अल रयान (कतार) : ट्युनिशिया संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात धक्कादायक विजय मिळवताना गतविजेत्या फ्रान्सला १-० असे नमवले. मात्र, या पराभवानंतरही ट्युनिशियाचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. याच गटातील अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कला १-० असे नमवून गटात दुसरे स्थान पटकावत बाद फेरी गाठली. ट्युनिशिया ४ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिले.
ट्युनिशियाला सूर गवसला खरा, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सलामीचा सामना डेन्मार्कविरुद्ध गोलशून्य बरोबरीत सोडवल्यानंतर ट्युनिशियाचा कांगारूंविरुद्ध ०-१ असा पराभव झाला होता. ट्युनिशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णाधार वाहबी खाजरी. त्याने ५८व्या मिनिटाला शानदार गोल करत ट्युनिशियाला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखली.फ्रान्सने दुसऱ्या सत्रात स्टार खेळाडू कायलन एमबाप्पेला मैदानात उतरवले. तो मैदानात आल्यापासून फ्रान्सचा वेग वाढला. त्यांनी सातत्याने आक्रमक चाली रचत ट्युनिशियाला दबावात राखले. याचा फायदा घेत निर्धारित वेळेनंतरच्या अतिरिक्त वेळेतील ९व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमन याने चेंडू गोलजाळ्यात धाडला. मात्र ‘वार’ प्रणालीत तो ऑफसाइड आढळल्याने हा गोल अवैध ठरला आणि फ्रान्सला पराभव टाळता आला नाही.
सलग तीन विश्वचषक सामन्यांमध्ये पहिला गोल करणारा वहाबी खाजरी हा पहिला आफ्रिकन फुटबॉलपटू ठरला. २०१४ साली विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीविरुद्धच्या पराभवानंतर फ्रान्सचा विश्वचषकात पहिला पराभव झाला. विश्वचषक स्पर्धेतील फ्रान्सची ९ अपराजित सामन्यांची मालिका खंडित झाली.