मुंबई : मुंबईकर रिषभ शाह याने श्रीलंकेत नुकताच झालेल्या दुस-या पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडताना दोन कांस्यपदकांची कमाई केली. रिषभने १४ वर्षांखालील गटात रॅपिड आणि ब्लिट्ज प्रकारात पदक जिंकले.तिसºया स्थानी असलेल्या रिषभने (इलो १,६७७ गुण) पहिल्या फेरीत श्रीलंकेच्या अलवाला ए. डी. हंसजाविरुद्ध विजय मिळवताना सकारात्मक सुरुवात केली. यानंतर रिषभने आपला विजयी धडाका कायम ठेवला. परंतु, बांगलादेशचा अव्वल मानांकीत एफएम मोहम्मद फहद रहमान (इलो २,१५३) याच्याविरुद्ध रिषभला पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर दोन लढती त्याने बरोबरीत सोडवल्याने त्याच्या सुवर्ण पदकाच्या आशाही संपुष्टात आल्या. मात्र, तरीही त्याने एकूण ७ पैकी ५ गुणांची कमाई करताना कांस्यपदक निश्चित केले. श्रीलंकेचा कँडिडेट मास्टर जीएम एच. तिलकरत्ने याने सहा गुणांसह सुवर्ण, तर बांगलादेशच्या फहद रहमानने ५.५ गुणांसह रौप्य पटकावले.यानंतर, ब्लिट्ज प्रकारातही रिषभला मोक्याच्या वेळी केलेल्या चुकांमुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात त्याने ४.५ गुणांची कमाई करत पदक निश्चित केले. या गटात रहमानने सुवर्ण पटकावतानाच, तिलकरत्नेने रौप्यपदक जिंकले.देशाचे प्रतिनिधित्वकरून पदक जिंकणे खूप सन्मानाची बाब आहे. यापुढेही देशासाठी पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न राहील. जागतिक विजेतेपद पटकावण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे. - रिषभ शाह
मुंबईकर रिषभने पटकावले दोन कांस्य, युवा पश्चिम आशिया बुद्धिबळ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:58 AM