ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - भारताने बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला. तिस-या पंचांकडे दाद मागण्यासाठी (डीआरएस) ऑस्ट्रेलियन खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या खेळाडूंचा सल्ला घेतात हे आम्हाला सामन्याच्या दुस-याच दिवशी समजलं होतं असं विराट कोहली म्हणाला.यावेळी पत्रकारांशी बोलताना विराटने ऑस्ट्रेलियाच्या संघावर बोचरी टीका केली.
सामना संपल्यानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विराट कोहलीने ऑ्स्ट्रेलिया संघाचा खोटारडेपणा सामन्याच्या दुस-याच दिवशी आमच्या लक्षात आला होता असं म्हटलं. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डीआरएसचा वापर करताना ड्रेसिंग रूमकडे पाहात असतात हे आम्हाला समजलं होतं. त्यामुळे सामन्याच्या दुस-याच दिवशी मी पंचांकडे याबाबत तक्रार करून हस्तक्षेप करण्यास सांगितलं होतं. मॅच रेफ्रींच्याही हा प्रकार आम्ही लक्षात आणून दिला. क्रिकेट खेळताना शेरेबाजी करण्यापर्यंत ठीक असतं मात्र क्रिकेटचे नियम आहेत त्यांचं पालन करायला हवं. आम्ही असल्या गोष्टी मैदानावर कधीच करत नाही आणि करणारही नाही अशी खरमरीत टीका कोहलीने स्मिथवर केली.
या सामन्यातील दुस-या डावाच्या 21 व्या षटकात तिस-या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणा-या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरवलं. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडुंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे तिस-या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राइकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला. पण तेथून तो ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रूमकडे पाहात होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करत होते. पंचांच्याही हे ध्यानात आलं ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असं करू शकत नाही असं ते त्याला म्हणाले. दरम्यान भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर ऑस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितलं.