रिओ : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ आयर्लंडविरुद्ध, तर ३६ वर्षांनंतर पात्रता मिळवणारा महिला संघ जपानविरुद्ध सलामीला झुंजणार आहे. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय पुरुष संघ आणि सुशीला चानूच्या नेतृत्वाखाली खेळणारा महिला संघ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यास उत्सुक आहे. ब्राझीलच्या रिओमध्ये ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत आयोजित आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष व महिला संघ येथे डेरेदाखल झाले आहेत. पुरुष संघ ६ आॅगस्ट रोजी सलामी लढतीत आयर्लंडच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे, तर महिला संघ ७ आॅगस्ट रोजी जपानविरुद्ध सलामीला झुंजणार आहे. पुरुष संघ माद्रिदमध्ये दोन सराव सामने खेळल्यानंतर थेट ब्राझीलमध्ये दाखल झाला आहे, तर आॅलिम्पिकची तयारी करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर असलेला महिला संघ फिलाडेल्फियाहून ब्राझीलमध्ये पोहोचला. अमेरिका दौऱ्यात महिला संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या दौऱ्यात भारतीय संघाने कॅनडाविरुद्ध दोन, तर अमेरिका संघाविरुद्ध एक सामना जिंकला. पुरुष संघाला मात्र स्पेनविरुद्ध दोन्ही सराव सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. महिला संघ ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. युवा कर्णधार सुशील चानूच्या नेतृत्वाखाली रिओमध्ये दाखल झालेल्या महिला संघाला ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे. या गटात भारतासह अर्जेंटिना, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका आणि जपान या संघांचा समावेश आहे. आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक असलेल्या चानूचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. चानू म्हणाली, ‘‘इंग्लंड व आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये सलग पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अमेरिका दौऱ्यात मिळवलेल्या विजयामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. आॅलिम्पिकपूर्वी याची संघाला गरज होती. स्पर्धेत आम्ही शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. उपांत्यपूर्व फेरी गाठणे आमचे पहिले लक्ष्य राहील.’’लंडनमध्ये एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्यपदक पटकावण्याचा इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाच्या कर्णधार श्रीजेशने आॅलिम्पिकमध्ये शानदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. पुरुष संघाचा ‘ब’गटात समावेश आहे. या गटात भारतासह जर्मनी, अर्जेंटिना, हॉलंड यांच्यासारख्या दिग्गज संघांचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार व स्टार गोलरक्षक श्रीजेश म्हणाला, ‘‘आमच्या गटात दिग्गज संघांचा समावेश असून त्यांना पराभूत करण्याचे पहिले लक्ष्य आहे. आम्ही यापूर्वीही या संघांना पराभूत केलेले असून या वेळी त्यात यशस्वी ठरू, असा विश्वास आहे. (वृत्तसंस्था)>पुरुष व महिला संघांचा कार्यक्रमपुरुष संघ : भारत विरुद्ध आयर्लंड (६ आॅगस्ट, शनिवार), भारत विरुद्ध जर्मनी (८ आॅगस्ट, सोमवार), भारत विरुद्ध अर्जेंटिना (९ आॅगस्ट, मंगळवार), भारत विरुद्ध हॉलंड (११ आॅगस्ट, गुरुवार), भारत विरुद्ध कॅनडा (१२ आॅगस्ट, शुक्रवार).महिला संघ : भारत विरुद्ध जपान (७ आॅगस्ट, रविवार), भारत विरुद्ध ब्रिटन (९ आॅगस्ट, मंगळवार), भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया (१० आॅगस्ट, बुधवार), भारत विरुद्ध अमेरिका (१२ आॅगस्ट, शुक्रवार), भारत विरुद्ध अर्जेंटिना (१३ आॅगस्ट, शनिवार).
पदक पटकावण्यास उभय संघ उत्सुक
By admin | Published: July 31, 2016 5:45 AM