- योगेश पांडे, नागपूर‘टी-२०’ विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन मातब्बर संघांमधील सामन्याला नागपूरसोबतच आजूबाजूच्या राज्यांतूनदेखील क्रिकेटरसिक आले होते. क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री ‘आॅनलाइन’ असल्यामुळे काळ््याबाजाराला प्रचंड ऊत आला होता. ‘लकी ड्रॉ’मध्ये क्रमांक लागलेल्या अनेक तथाकथित पांढरपेशांनीदेखील यात आपले हात धुऊन घेतले. सामना सुरू होण्याच्या काही वेळ अगोदरपर्यंत ५०० चे तिकीट अडीच हजारांना तर दोन हजारांचे तिकीट सात हजारांहून अधिक किमतीला विकण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ला आढळून आले.नागपुरातील या ‘हायप्रोफाईल’ सामन्यासाठी किमान ४०० आणि जास्तीत जास्त ३३ हजार अशा किमतीची तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सर्व विक्री ‘आॅनलाइन’ होती व यासाठी इच्छुकांना २४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंतच नोंदणी करायची होती. त्यानंतर ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून तिकीट विक्री करण्यात आली. नियमांनुसार भारताचा सामना असल्याने प्रत्येक नोंदणीसाठी दोनच तिकीट देण्यात आली. यातील ४००, ५००, १०००, १५०० आणि दोन हजार रुपयांच्या तिकिटांना सर्वात जास्त मागणी होती. एका खासगी संकेतस्थळाकडूनदेखील तिकीट विक्री करण्यात आली व ही कमी दराची तिकिटे हातोहात ‘बुक’ झाली. जास्त दरांच्या तिकिटांनादेखील मागणी असल्याचे दिसून आले. परिणामी मंगळवारी १२ हजार रुपयांची तिकिटेदेखील शिल्लक नव्हती. परिणामी क्रिकेटसाठी ‘कुछ भी करेगा’ अशी मानसिकता असणाऱ्यांनी वाट्टेल त्या किमतीत तिकिटे घेण्याची तयारी दाखविली. त्यामुळे अव्वाच्या सव्वा किमतीला तिकिटे विकली जात होती. तरुणांचा सहभागअनेक जणांना ‘लकी ड्रॉ’मध्ये तिकिटे लागली होती. यातील काहींनी प्रत्यक्ष सामन्याला न जाता तिकिटे चढ्या भावाने विकली. विशेषत: बाहेरून आलेल्या क्रिकेट चाहत्यांनी मागेल त्या किमतीत तिकिटे घेतल्याचे आढळून आले. यात विद्यार्थी, पांढरपेशे तरुण यांचा सहभाग जास्त दिसून आला. एकेका तिकिटामागे हजार रुपयांचा नफा कमाविला, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.‘व्हॉट्स अॅप’वरून प्रसार‘व्हॉट्स अॅप’च्या माध्यमातून सर्वात जास्त तिकिटांचा काळाबाजार झाला. आपल्याकडे तिकीट असून इच्छुकांनी संपर्क करावा. अनेकांनी ‘व्हॉट्स अॅप’च्या विविध ‘ग्रुप’वर संदेश टाकले. त्यामुळे एकमेकांना न ओळखणाऱ्यांमध्येदेखील काळ््याबाजारामार्फत तिकीट विक्री करणे शक्य झाले. आश्चर्याची बाब म्हणजे यावर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक दिसून आला नाही.
दोन हजारांचे तिकीट सात हजारांना
By admin | Published: March 16, 2016 8:39 AM