बंगळुरू : प्रो कबड्डीच्या आठव्या सत्राची दणक्यात सुरुवात करताना नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या यू मुंबाने शानदार खेळ करत यजमान बंगळुरू बुल्सला ४६-३० असा मोठा धक्का दिला. हुकमी रेडर अभिषेक सिंग हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एकट्याने आक्रमणात १९ गुणांची लयलूट करताना बंगळुरू संघाची हवा काढली.
कोरोना निर्बंधांमुळे प्रेक्षकांविना होत असलेल्या यंदाच्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली. मुंबई संघात कर्णधार फझल अत्राचलीचा अपवाद सोडला, तर फारसे कोणी अनुभवी नव्हते. दुसरीकडे, बंगळुरूकडे अनुभवी खेळाडूंची फळी असल्याने त्यांना संभाव्य विजेते मानले जात होते.
बंगळुरूचा कर्णधार आणि स्टार रेडर पवन शेरावत याचा चांगला अभ्यास करून उतरलेल्या मुंबईकरांनी पवनचे आक्रमण रोखले. येथेच बंगळुरू संघ मानसिकरीत्या मागे पडला. दुसऱ्या सत्रात बंगळुरूकडून काहीसा प्रतिकार पाहण्यास मिळाला, मात्र मुंबईकरांनी सामन्यावरील पकड सोडली नाही. व्ही. अजितनेही आक्रमणात ६ गुण घेत अभिषेकला चांगली साथ दिली. फझल, रिंकू व हरेंद्र कुमार यांनी बंगळुरूच्या आक्रमकांची शानदार पकड केली. बंगळुरूकडून चंद्रन रणजीतने १३, तर कर्णधार पवनने १२ गुण घेत अपयशी झुंज दिली. मुंबईकरांनी बंगळुरूवर तीन वेळा लोण चढवले.
यानंतर झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तेलगु टायटायन्स आणि तामिळ थलाईवाज यांनी ४०-४० अशी बरोबरी साधली. अन्य लढतीत बेंगाल वॉरियर्सने यूपी योद्धाचा ३८-३३ असा पराभव केला.