रोहित नाईक, मुंबईउपांत्य फेरी निश्चित झाल्यानंतर गुणतक्त्यात अग्रस्थान मिळवण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या बलाढ्य यू मुंबाने अपेक्षित विजय मिळवताना स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दबंग दिल्लीचा ३६-२० असा धुव्वा उडवला. यासह मुंबईकरांनी ६० गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी गुणतक्त्यात अव्वल स्थानावर कब्जा केला. तत्पूर्वी, झालेल्या एकतर्फी सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सला ४३-१९ असे लोळवून तिसऱ्या स्थानी झेप घेतली.दिल्लीने या सामन्यात राखीव खेळाडूंना खेळवल्याने मुंबईकरांनी सावध पवित्रा घेऊन प्रतिस्पर्धी खेळाडूंचा अंदाज घेतला. दिल्लीकरांनी याचा फायदा घेऊन सुरुवातीला आघाडी घेतली खरी; मात्र नंतर मुंबईकरांनी अखेरपर्यंत आक्रमक धडाका राखून दिल्लीला पुनरागमनाची संधी दिली नाही. मध्यंतराला १५-८ असे वर्चस्व राखलेल्या मुंबईकडून पुन्हा एकदा रिशांक देवाडिगा आणि कर्णधार अनूपकुमार यांचा खेळ मोलाचा ठरला. सेल्वामनी के.च्या नेतृत्वाखाली उतरलेल्या दिल्लीकरांच्या अनुभवाची कमतरता या वेळी स्पष्ट दिसली. सेल्वामनीच्या चढायांसह अनिल निंबोळकर व संदीप धूलच्या दमदार पकडी दिल्लीसाठी अपयशी ठरल्या. मुंबईकरांनी दुसऱ्या डावात दिल्लीवर २ लोण चढवून अखेर अव्वल स्थान काबीज केले.तत्पूर्वी, पुणेरी पलटणने जबरदस्त आक्रमण करताना बंगाल वॉरियर्सचा ४३-१९ असा फडशा पाडला. दीपक हुडाने तुफानी चढाया करीत १३ गुणांची वसुली करून बंगालला दबावाखाली ठेवले. तर, सुरजितने अष्टपैलू खेळ करताना ८ गुणांची वसुली करून बंगालच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरानंतर पुणेकरांनी आपल्या केनियाच्या खेळाडूंना बदली म्हणून उतरवले. या वेळी सिमॉन किबुराने एक गुण घेतला. दुसऱ्या बाजूला बंगालकडून महेंद्र राजपूतचे आक्रमण, जँग कुन लीचा अष्टपैलू खेळ व कर्णधार नीलेश शिंदेच्या पकडी संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरल्या. अव्वल स्थान मिळविल्याचा आनंद आहे आणि आता आम्ही उपांत्य फेरीसाठी सज्ज आहोत. उपांत्य फेरीतील सर्वच संघ तोडीस तोड असून, प्रत्येक संघापुढे मोठे आव्हान असेल. - अनूपकुमार, यू मुंबाकोणताही सामना सोपा नसतो. तुम्ही खेळ कसा करता, यावर सगळे अवलंबून असते. यंदा संघात अनेक नवीन खेळाडू आले आणि प्रत्येकाने संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच मला विश्वास आहे, की आम्ही अंतिम फेरीतही नक्की पोहोचू.- दीपक हुडा, पुणेरी पलटण
दिल्लीचा पराभव करून यू मुंबाचा अव्वल स्थानावर कब्जा
By admin | Published: March 03, 2016 4:04 AM