मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या सीझनसाठी आज आणि उद्या लिलाव पार पडणार आहे. यू मुंबासह अनेक संघांनी त्यांच्या रिटेन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत आणि दोन दिवसांच्या लिलावात ते कोणत्या खेळाडूंसाठी जोर लावतात याची उत्सुकता आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये 'एलिट रिटेन्ड प्लेअर्स', 'रिटेन्ड यंग प्लेअर्स' आणि 'एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स'ची घोषणा केली. एकूण ८४ खेळाडूंना ३ श्रेणींमध्ये कायम ठेवण्यात आले असून २२ एलिट रिटेन्ड प्लेअर्स (ERP) श्रेणीतील, २४ रिटेन्ड यंग प्लेअर्स (RYP) श्रेणीत आणि ३८ विद्यमान न्यू यंग प्लेयर्स (ENYP) श्रेणीत आहेत. रिटेन्ड न केलेल्या खेळाडूंमध्ये पवन सेहरावत आणि विकास कंडोला यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.
या लिलावाच्या रणनीतीबाबत यू मुंबाचे मुख्य प्रशिक्षक केसी सुतार यांनी सांगितले की,''आमच्या प्रशिक्षकांमध्ये चांगला समन्वय आहे आणि कोणत्या खेळाडूला संघात खेळावयचे, कोणावर काय जबाबदारी द्यायची यावर आम्ही चर्चा करतो.''
२०१५ मध्ये यू मुंबाने प्रो कबड्डीचे जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर पुढच्या पर्वात त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर यू मुंबाची कामगिरी काही खास झालेली नाही. मागील पर्वात ते ९व्या स्थानावर राहिले होते. त्याबाबत सुतार म्हणाले,''कोचिंग स्टाफ चांगलंच काम करतात.. मैदानावर खेळाडू कसे खेळतात हे महत्त्वाचे आहे. संघाची कामगिरी चांगली झालेली आहे.. कधीकधी चांगल्या संघांचाहा कॉर्डिनेशन बिघडतं. मागील पर्वात आम्ही अव्वल ६ मध्ये पोहचू शकलो असतो, परंतु काही गुणांच्या फरकाने आम्हाला अपयश आले. पण, याचा अर्थ असा नाही की आम्ही चांगली कामगिरी केलेली नाही. काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाले. प्रत्येक संघ चांगल्या कामगिरीसाठीच मैदानावर उतरतो.''
''यंदाच्या प्रो लीगमध्ये युवा खेळाडूंना संघात घेतले आहेत आणि अनुभवी खेळाडूंना संघात कायम ठेवले गेले आहे. हे सीझन खूप लांब चालणारा आहे, त्यामुळे युवा व अनुभवी खेळाडू असे संतुलन राखणे गरजेचे आहे. सर्वोत्तम खेळाडू घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.. आता कोणत्या खेळाडूसाठी आम्ही जोर लावणार हे मी आत्ताच सांगू शकत नाही. पण, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आणि त्यानुसारच आम्ही खेळाडू निवडणार आहोत. यंदाच्या पर्वात प्रो कबड्डीचे सामने १२ शहरांमध्ये होणार आहेत आणि नवीन मैदानावर खेळाडूंना प्रत्येकवेळी नवीन ऊर्जा मिळते. हे खेळाडूंसाठी व संघासाठी महत्त्वाचे आहे,''असेही त्यांनी आगामी लीगबाबत बोलताना म्हटले.