रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलू लागली आहे. जगातील अनेक देश रशिया विरोधात एकत्र येत आहेत. यातच, रशियाला एक मोठा झटकाही बसला आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे होणारा UEFA चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना आता तेथून हलविण्यात आला आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. UEFA ने एक महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक शुक्रवारी होईल. याच बैठकीत अधिकृतरित्या चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना सेंट पीटर्सबर्गबाहेर घेण्याचा निर्णय घेतला जाईल.
UEFA ने दिलेल्या माहितीनुसार, रशिया आणि युक्रेनमधील सध्यस्थिती पाहता, UEFA च्या अध्यक्षांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक शुक्रवारी 10.00 CET वाजता होईल. याच बैठकीत भविष्यातील निर्णय घेतला जाईल. याची घोषणा बैठकीनंतरच केली जाईल.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यापासूनच, फुटबॉल जगत चिंतीत होते. अनेक देशांनी आणि फुटबॉल संघटनांनी आधीच हरकत घेत, चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशिया बाहेर हलविण्याची मागणी केली होती. हा सामना मे, 2022 मध्ये रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथील मैदानात होणार होता.