टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात व्हायला सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली. त्यात युगांडाचा वेटलिफ्टर ट्रेनिंग कॅम्पमधून पळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नियमित कोरोना चाचणी देण्यात अपयशी ठरल्यानंतर तो हरवला. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार त्या खेळाडूनं घरी परत जाण्यापेक्षा जपानमध्येच राहण्याची इच्छा व्यक्त करणारी नोट लिहिली आहे. ( Ugandan weightlifter goes MISSING from Tokyo Olympic training camp)
शुक्रवारपासून हा वेटलिफ्टर ऑलिम्पिक ट्रेनिंग कॅम्पमधून गायब असल्याचे वृत्त समोर आले. ज्युलिअस सेकिटोलेको ( Julius Ssekitoleko ) असे या खेळाडूचे नाव आहे. २० वर्षीय खेळाडूला शोधण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
काही मीडियाच्या वृत्तानुसार ज्युलिअसनं मागे एक नोट सोडली आहे. त्यात त्यानं जपानमध्येच राहून काम करणार असल्याचे लिहिले आहे. युगांडा येथे जगणं अवघड असल्याचेही त्यानं लिहिलं. ज्युलिअस हा टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नव्हता अन् त्याला पुढील आठवड्यात मायदेशात पाठवण्यात येणार होते. ट्रेनिंग कॅम्प शेजारील बुलेट ट्रेन स्थानकावरून नागोयासाठीचे तिकिट घेतले.
युगांडा संघातील दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी एक ज्युलिअस आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युगांडा वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सलमी मुसोके यांनी सांगितले की,''मला जेव्हा हा मॅसेज मिळाला, तेव्हा धक्काच बसला. त्यांच्या सुरक्षेत उणीवा आहे. मग ते कोणत्या कडक सुरक्षेविषयी बोलत होते?. खेळाडूचं असं पळून जाणं देशासाठी चांगली गोष्ट नाही. त्याचा शोध लागावा ही मी प्रार्थना करतो.''